तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्गावर कार आणि आशयर ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेत कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आयशर चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
रहेमान सुलेमान तांबोळी (वय ४८) अरबाज चांदुभाई तांबोळी (वय २१, दोघे. रा.लेखनगर सिडको) सीज्जू पठाण (वय ३८, रा.इंदिरानगर) अक्षय जाधव (२४, रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) अशी मृतांची नावे आहेत. अरबाज याचा महिनाभरपूर्वीच साखरपुडा झाला होता. या अपघाताची (Accident News) बातमी वाऱ्यासारखी पसरताच शासकीय जिल्हा रुग्णालयात नातेवाईक, मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोंबडी खत वाहतूक करणारा आयशर ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून (Nashik News) आडगावकडे सुसाट वेगाने जात होता. याचवेळी अचानक ट्रकचा टायर फुटला. काही क्षणातच ट्रक दुभाजकावर चढून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक लेनवर जाऊन कारवर आदळला.
अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत कारमधील ४ जण जागीच ठार झाले. तर ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कारचा चेंदामेंदा झाल्याने नाशिक अग्निशमन दलाचची मदत मागविण्यात आली.
कोणार्कनगर विभागाचे बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून कारचा पत्रा कापून मृतदेह काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सगळे जण देवळा तालुक्यातील सटाणा येथे गेले होते. तेथून नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.