मध्य प्रदेशात 'लाडली बहन' योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली. त्याचीच पुनरावृत्ती करत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातल्या सेतू केंद्रांवर महिलांची मोठी झुंबड उडालीय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत १५ जुलैपर्यंत आहे. त्यामुळे महिलांनी सेतू केंद्रांसमोर मोठ्या रांगा लावल्या आहेत. त्याचाच फायदा उचलत आता दलालांनी या लाडक्या बहिणींना लुटण्याचा सपाटा लावलाय.
सोलापुरात या लाभार्थी महिलांकडून ३०० ते ४०० रूपये उकळले जातायत. तर कोल्हापुरात तासंतास रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे महिला वैतागल्या आहेत. आणि त्यामुळेच योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केलीय. तिकडे अमरावतीच्या सावंगीत तलाठी अर्ज भरण्यासाठी ५० रूपयांची पैशांची मागणी करत असल्याचं उघड झालंय. महिलांकडून पैसे घेतांनाचा व्हिडीओही व्हायरल झाला. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली. आणि या तलाठ्याचं जिल्हाधिका-यांनी निलंबन केलं. या घटनेची मुख्यमंत्र्यांनीही गंभीर दखल घेत पैसे मागणा-या कर्मचारी, अधिका-यांना घरी बसवु, असा सज्जड दम दिलाय.
आषाढी एकादशीसाठी अनेक महिला वारीत आहेत. त्यामुळे या योजनेची अंतीम तारीख काढून टाकावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत केलीय. त्यावर सकारात्मक निर्णय़ाचं आश्वासन सरकारनं दिलंय. राज्यातल्या बहुतेक महा-ई सेवा केंद्रावर एजंटचा सुळसुळाट झालाय. त्याला चाप बसणे गरजेचे आहे. नुसती लोकप्रिय घोषणा करुन चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी तिककीच प्रभावी, पारदर्शकपणे होणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.