
अकोल्यात शेतकऱ्याची बैलजोडी नदीच्या प्रवाहात वाहिली.
एका बैलाला वाचवण्यात यश आलं तर दुसऱ्याचा मृत्यू झाला.
मुसळधार पावसामुळे पूरस्थिती आणि शेतीचं मोठं नुकसान.
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने मराठवाडा तसेच घाटमाथ्याला चांगलेच झोडपले आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली, तर काहींच्या घरात पाणी शिरले. शेतकऱ्यावर ओल्या दुष्काळाचं आकाश कोसळलं आहे. अशातच आज अकोल्यात एक तरुण शेतकरी आपल्या बैलांच्या जोडीला घेऊन शेतात जात होता.
यादरम्यान निर्गुणा नदी पात्र पार करीत असताना बैलांची जोडी पाण्याच्या प्रवाहात ओढली गेली. या दुर्घटनेत एका बैलाला वाचवण्यात यश आले असून दुसरा बैल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या बैलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी गजानन बबन लहामगे हा तरुण शेतकरी दुपारी २:३० वाजता आपली बैल जोडी घेऊन शेतात जात होता. मात्र निर्गुणा नदी पात्र पार करीत असताना नदीच्या प्रवाहात बैल बंडी वाहत खाली येत असल्याचे त्याला जाणवले.
या दरम्यान माळीपुर्यातील युवक नामदेव इंगळे, मयूर निमकंडे,प्रेमानंद देवकर, हर्षल बिडकर, विकी बंड या तरुण मंडळींनी वाहत येत असलेल्या बैल बंडीला पकडले. तरुणांच्या अथक प्रयत्नांनी एका बैलास जीवदान देता आले. मात्र एका बैलाला ते वाचवू शकले नाही. स्थानिक तरुणांच्या मदतीने बैलांच्या जोडीला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. दरम्यान शेतकऱ्याकडे असलेल्या बैल जोडी मध्ये विष्णू काकड यांचा बैल गजानन लहामगेकडे वाहिती करण्यासाठी होता.
नेमका त्याच बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. आधीच शेतकऱ्यांवर पावसाचे संकट असताना बैलाचा मृत्यू म्हणजे न पेलणारे संकट या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
युवकांच्या धाडसा बद्दल कौतुक होत आहे.शासनाने या गंभीर बाबीची दखल घेत निर्गुणा नदी पात्रा मध्ये पुलाची निर्मिती तात्काळ करावी जेणे करून शेतकऱ्यांना अशा संकटाना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. दरम्यान शासन शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष देणार का ? त्या प्रश्नांचे निरसन करणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.