
संभाजीनगर मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी.
वय वाढत असल्याने आणि मनस्थिती शांत ठेवण्यासाठी राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण.
उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्याचे केलेले प्रयत्न अपयशी.
कुणावर नाराजी नसल्याचं महाजन यांचं वक्तव्य, मात्र राजीनाम्यामुळे चर्चा रंगल्या.
मनसेतून एका महत्वाच्या नेत्यानं पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. नाराजीतून त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र यावेत, यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले होते. मात्र, एकत्र आल्यानंतर त्यांनी थेट पक्षाला रामराम केला. महाजन नाराज असण्यामागचं कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
राजीनामा दिल्यानंतर प्रकाश महाजन म्हणाले, 'माझं आता वय वाढत चाललं आहे. काही गोष्टी मनाविरूद्ध घडत आहेत. मी आता थांबायचा निर्णय घेतला आहे. माझा कुणावरही राग किंवा नाराजी नाही. मी अत्यंत लहान प्रवक्ता आहे', असं प्रकाश महाजन म्हणाले. 'माझं खरंतर कशावरही आक्षेप नाही. मी कोणत्याही मोठ्या पदावर नव्हतो. त्यामुळे माझ्यासारखा प्रवक्ता राहिला काय अन गेला काय.. याचा पक्षाला विशेष फरत पडत नाही', असंही महाजन म्हणाली.
'या वयात मनस्थिती चांगली राहायला हवी. या कारणामुळे मी या सगळ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा स्वत: आपण गेलेसं बरं', असंही महाजन म्हणाले. 'खरंतर वाईट या गोष्टीचं वाटतंय की अमित ठाकरेंना मी दिलेला शब्द पाळू शकलेलो नाही. बाकी कशाचंही ओझं माझ्या मनावर नाही', असं महाजन म्हणाले.
याआधी मुंबईत मनसेच्यावतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला त्यांना आमंत्रण दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे महाजन नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर अमित ठाकरे महाजनांना भेटले. त्यांची समजूत काढली. त्यानंतर महाजनांची नाराजी दूर झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.