प्रितिश देशमुखला थेट ‘मंत्र्याचा’ आशिर्वाद? मंत्र्याच्या PA ला मर्सर्डिज बेन्झ गिप्ट

राजकीय वरदहस्त असल्यानं त्याला सहज कोट्यवधी रुपयांची कंत्राट मिळाले.
प्रितिश देशमुखला थेट ‘मंत्र्याचा’ आशिर्वाद? मंत्र्याच्या PA ला मर्सर्डिज बेन्झ गिप्ट
प्रितिश देशमुखला थेट ‘मंत्र्याचा’ आशिर्वाद? मंत्र्याच्या PA ला मर्सर्डिज बेन्झ गिप्टSaam TV
Published On

नागपूर : ‘म्हाडा’ व ‘टीईटी’ परीक्षेतील गैरव्यवहाराचा सूत्रधार आणि जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याला अनेक राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याची माहिती पुढं आली आहे. या बळावरच त्याने अल्पावधीतच कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळवून दिल्यानं कंपनीनं त्याची महाराष्ट्राच्या संचालकपदी नियुक्ती केली होती. विशेष म्हणजे, डॉ. प्रीतीश देशमुखने नुकतीच एका मोठ्या राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाला मर्सडीज बेंझ गाडी घेऊन दिल्याचीही माहिती आहे. राजकीय वरदहस्त असल्यानं त्याला सहज कोट्यवधी रुपयांची कंत्राट मिळाले.

डॉ. प्रितिश देशमुख (Pritish Deshmukh) हा वर्धातील मुळचा राहणारा आहे. त्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतले होते. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात न जाता राजकीय संबंधांचा वापर करून तो बंगळुरू येथील जी.ए. सॉफ्टवेअर (G.A. Software) टेक्नॉलॉजी या कंपनीशी जुळला. या कंपनीशी जुळताच प्रीतीशने राजकीय वशिल्याचा वापर करून कंपनीला अनेक सरकारी कंत्राट मिळवून दिले. या कंत्राटामुळे अल्पावधीतच नव्याने स्थापन झालेल्या या कंपनीचीही आर्थिक बाजू भक्कम झाली.

प्रितिश देशमुखला थेट ‘मंत्र्याचा’ आशिर्वाद? मंत्र्याच्या PA ला मर्सर्डिज बेन्झ गिप्ट
भाजपचं हिंदुत्व 'चोरबाजार' असेल तर शिवसेनेचं हिंदुत्व 'भेंडीबाजार' - राणे

त्यामुळे कंपनीने प्रीतीशला कंपनीचा महाराष्ट्राचा संचालक म्हणून नियुक्त केले. संचालकपदी रूजू होताच प्रीतीशच्या अपेक्षा उंचावल्याने त्याने सरळसेवा भरतीच्या सर्व मोठ्या परीक्षांचे कंत्राट आपल्यालाच मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले. मुळात सरळसेवा भरतीसाठी महाआयटीने चार कंपन्यांची निवड केली आहे. यातील कुठल्याही एका कंपनीकडून परीक्षा घेण्याचा अधिकार हा संबंधित विभागाला आहे. त्यामुळे ज्या विभागाची परीक्षा असेल त्या पक्षाच्या बड्या राजकीय नेत्यांशी किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यकांशी बोलणी करून प्रीतीश हे कंत्राट आपल्या कंपनीकडे खेचून आणत असे.

यातूनच जी.ए. सॉफ्टवेअरला आधी टीईटी (TET) आणि आता ‘म्हाडा’च्या (Mhada) भरतीचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. यासाठी एका नेत्याच्या स्वीय सहाय्यकाला मर्सडीज बेंझ गाडी घेऊन दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात पुढे अनेक गूढ उलघडण्याची शक्यता आहे. प्रीतीशचा वर्धेत राजगृह नावाचा मोठा बंगला आहे. त्याच्या वडीलांचा कोरोनाकाळात मृत्यु झाला. त्याचे नागपूरच्या मुलीशी लग्न जुळले असून 28 तारखेला त्याचं लग्न आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com