पवारांना काँग्रेसची साथ, ठाकरेसेना नाराज? शिंदेसेना-राष्ट्रवादीत समेट, शिंदेसेनेतच फाटफूट

Marathwada Graduate Constituency Election Political Battle: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शह-काटशहाचा राजकारण चांगलचं रंगलयं...एकीकडे शिंदेसेनेनं दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असला तरी शिंदेसेनेच्या एका आमदारानं शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय...त्यामुळे राजकारणात कुणीच कुणाचं नसतं...हे छत्रपती संभाजीनगर पदवीधरमध्ये कसं अधोरेखित झालयं...पाहूयात
Marathwada Graduate Constituency election latest political updates
Marathwada Graduate Constituency election latest political updatessaam tv
Published On: 

मराठवाडा पदवीधर हा भाजप आणि राष्ट्रवादी या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा मतदारसंघ आहे. मात्र राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांचा या मतदारसंघावरही मोठा परिणाम झालाय. दादांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी महायुतीकडून अधिकृत उमेदवारी मिळालीय...पण दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवारीवर एकमत होऊ शकलं नाही. ठाकरेसेनेकडून दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय... त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन मित्रपक्षांचे उमेदवार आमनेसामने आलेत

मुळात अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंच्या उमेदवाराविरोधात भाजप इच्छुकांनी बंडखोरी केलीय. मात्र अमरावतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला तरच संभाजीनगरात राष्ट्रावादीसाठी काम करणार असल्याची जाहीर भूमिका मंत्री संजय शिरसाटांनी घेतली होती. त्यानुसार दोन्ही पक्षांनी सोयीच्या भूमिका घेतल्या आणि वादावर पडदा पडलाय.

राष्ट्रवादी-शिंदेसेनेत समेट झाला असला तरी दुसरीकडे शिंदेसेनेतलीच फाटाफूट समोर आलीय. मंत्री संजय शिरसाटांनी सतीश चव्हाणांना शिंदेसेनेकडून पाठिंबा जाहीर केला असला तरी शिंदेसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट महाविकास आघाडीतल्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या डॉ. प्रतापसिंह पाटलांना पाठिंबा जाहीर केलाय...

सत्तारांनी तर थेट सिल्लोडच्या शिवसेना भवनात बैठक घेऊन प्रतापसिंह पाटलांना मतदान करण्याचं आवाहन केलं, महायुतीसारखीच कुस्ती मविआतही सुरू झालीय. प्रतापसिंह पाटील मविआचे अधिकृत उमेदवार असतानाही ठाकरेसेनेनं दिलीप घुगेंना उमेदवारी दिल्यानं मविआत फूट पडलीय...विशेष म्हणजे काँग्रेसनं पवारांच्या उमेदवाराला अधिकृत पाठिंबा जाहीर केल्यामुळे ठाकरेसेना नाराज झाल्याची चर्चा आहे. दरम्यान काँग्रेस खासदार कल्याण काळेच नव्हे तर ठाकरेसेनेचे आमदार आणि प्रतापसिंह पाटलांंचे लहान भाऊ राहुल पाटील यांनीही प्रतापसिंह पाटलांना पाठिंबा जाहीर केलाय.. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा बंधूप्रेम विधानपरिषदेच्या निवडणुकीत श्रेष्ठ ठरल्याचं अधोरेखित झालयं...

मुळात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच मागील तीन निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली होती... त्यात सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला होता. पण यावेळी समीकरणं बदलली आहेत. अधिकृत उमेदवाराविरोधातच मित्रपक्षांनी दंड थोपटल्यानं चव्हाणांच्या अडचणी वाढल्यायत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्याच पक्षांमध्ये अंतर्गत धूसफूस निर्माण झालीय. आणि त्यामुळेच दोन्ही बाजूच्या उमेदवारांची धाकधूक वाढलीय. आता कोणाच्या नाराजीचा फटका कुणाला बसणार? पडद्यामागे आणखी काही वेगळी गणित जुळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com