Manoj Jarange Patil latest statement on Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याने मराठ्यांवर अन्याय केलाय आणि सरकार माझ्या सहकाऱ्यांना जाणूनबुजून चौकशांच्या फेऱ्यात अडकवत आहे,' असा घणाघाती आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर, मला गोळ्या घातल्या तरी मी शरण जाणार नाही, असे म्हणत जरांगे पाटलांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले. येत्या १९ सप्टेंबरपासून मुंबईत उपोषण करण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. आमच्यावर अन्याय करूनही आम्ही शांत राहायचे का? शिंदेंच्या मंत्र्यांनी मराठ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, परवा सकाळी ११ वाजता ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. गणेशोत्सवाचे कारण देऊन आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या वर्षीही गणेशोत्सव होता, मग वर्षभरात सरकारने काय केले? आम्ही सरकारला तीन वर्षे वेळ दिला, तरीही मराठ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आता १९ सप्टेंबरपासून मुंबईत लोकशाही मार्गाने उपोषण सुरूच राहणार, असे जरांगे म्हणाले.
आंदोलनात मदत करणाऱ्या श्रीमंत मराठा बांधवांवर आणि आपल्या सहकाऱ्यांवर शनिवारी-रविवारी चौकशा लावून त्रास दिला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, माझ्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात आहे. आंदोलन काळातच या चौकशा का लावल्या जात आहेत? जर माझ्या सहकाऱ्यांची चौकशी थांबली नाही, तर आम्ही थेट ईडीच्या (ED) कार्यालयाला घेराव घालू.
भावूक झाले जरांगे; गोळ्या घातल्या तरी शरण जाणार नाही
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील अत्यंत भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मला मराठा समाजासाठी लढा टोकाचा द्यायचा आहे. सरकार मला निष्ठा विकत घेऊ शकत नाही म्हणून मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी त्रास देत आहे. आता मला पोलिसांकडून गोळ्या घालून मारणे हाच एक पर्याय सरकारकडे उरला आहे. मला गोळ्या घातल्या तरी चालतील, मी मराठ्यांच्या लेकरांसाठी प्राण देईन पण सरकारपुढे कधीही गुडघे टेकणार नाही, असा घणाघाती इशारा त्यांनी दिला.
आपल्या वक्तव्यांवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना जरांगे म्हणाले, माझी भाषा शिवराळ नसून खेड्यातील साधी भाषा आहे. तरीही माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावले असेल तर मी ते शब्द मागे घेतो. पण सरकारने आधी मराठ्यांचे प्रश्न सोडवावेत आणि मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणारा जीआर त्वरित काढावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.