अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी
Manoj Jarange Patil 13 demands for Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसत आहेत. "जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आता काहीही झाले तरी माघार घेणार नाही," अशी आक्रमक भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे १३ मागण्यांची यादी पाठवली आहे.
उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला 'आळस झटकून टाका आणि पेटून उठा' असे थेट आवाहन केले आहे. तसेच "यावेळी मुंबईत आलो तर मागच्या पाऊलाने मागे हटणार नाही," असा थेट इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या या आंदोलनापुढे सरकार काय भूमिका घेते, प्रशासनाचे शिष्टमंडळ त्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार का आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख १३ मागण्या:
१. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप: निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे.
२. हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी: हैदराबाद गॅझेटिअरचा केवळ जीआर (शासन निर्णय) काढण्यात आला आहे, परंतु त्यातील संख्येनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. नोंदींनुसार मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत आणि त्याची व्हॅलिडिटी (जातीचे वैधता प्रमाणपत्र) कशी देणार, हे स्पष्ट करावे.
३. इतर संस्थानांच्या गॅझेटिअरचा जीआर: सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान आणि औंध-पुणे-बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटिअरचा तातडीने जीआर काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी.
४. गुन्हे मागे घेणे: अंतरवाली सराटीतील गुन्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
५. स्वतंत्र मंत्रालय: मराठा समाजासाठी 'मराठा आणि कुणबी' असे स्वतंत्र मंत्रालय तत्काळ स्थापन करण्यात यावे.
६. प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी: ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, त्यांना आजच्या आज प्रमाणपत्रे द्यावीत. तसेच ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांना लगेचच व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यावे.
७. ओबीसी सवलतींचा जीआर: मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सोयी-सुविधा आणि सवलती देण्याबाबत काढलेल्या जीआरची प्रभावी अंमलबजावणी करावी.
८. 'सारथी'च्या योजना आणि शिष्यवृत्ती: 'सारथी' संस्थेच्या सर्व प्रलंबित योजना सुरू कराव्यात, डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचा निधी तातडीने वितरीत करावा आणि वसतिगृहांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
९. बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबांना मदत: मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्यात यावी.
१०. शिंदे समितीचे काम पूर्ववत: शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासूनच पुन्हा जुने रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश द्यावेत.
११. विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या: EWS, SEBC आणि ESBC प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा तरुणांना आजच्या आज नियुक्ती पत्रे देण्यात यावीत.
१२. अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा: अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ज्या मराठा तरुणांनी वाहने घेतली आहेत, त्यांचा प्रलंबित असलेला संपूर्ण व्याज परतावा सरकारने आजच्या आज जमा करावा.
१३. 'सगे-सोयरे' अधिसूचना: 'सगे-सोयरे'बाबतच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
जालन्यातील १७०० पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आजपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी आणि परिसरात पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जालन्यातील तब्बल १७०० पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, आजपासून ते ५ सप्टेंबरपर्यंत वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व प्रकारच्या सुट्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
वडीगोद्री फाट्यावर बॅरिकेटींग, वाहनांना बंदी
धुळे-सोलापूर महामार्गावरून अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडीगोद्री फाटा येथे पोलिसांनी बॅरिकेटींग केले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहनांना आत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. आंदोलनाला येणाऱ्या नागरिकांना केवळ पायी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.