
मनोज जरांगे पाटलांनी मराठा-ओबीसी समाजात दंगल घडवण्याचा आरोप सरकारवर केला.
त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट जबाबदार धरले.
जर दंगल झाली तर त्याचा फटका केंद्र सरकारलाही बसेल, असा इशारा दिला.
२९ ऑगस्टला 'मुंबई चलो' आंदोलन आझाद मैदानावर होणार आहे.
मराठा आणि ओबीसी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरूय, मात्र असं होणार नाही. याउलट दोन्ही समाज एकत्र येत फडणवीस यांना अद्दल घडवतील. जर ओबीसी आणि मराठामध्ये दंगल घडली तर याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहतील. तसेच याचा फटका केंद्रातील सरकारला सुद्धा बसेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पु्न्हा एकदा लढा उभारलाय. मराठा समाजाच्या माध्यमातून २९ ऑगस्टला 'मुंबई चलो' चा नारा देण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ते पश्चिम महाराष्ट्रात दौरा करत आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एका मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. फलटण तालु्क्यातील मराठा समाजातील बांधवांसोबत त्यांनी बैठक घेतली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दंगल घडली तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अशा शब्दात जरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. सरकार २९ ऑगस्टला मराठा आरक्षण कसे देत नाहीत, तेच मी पाहतो. मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण घेणार आणि २९ तारखेला आरक्षणाचा तुकडा पाडणार. आरक्षण घेणार ते पण ओबीसीतूनच, असं माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, याचा मला आनंद होतोय. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाचा दौरा केल्यानंतर मराठा समाजाची मोठी गर्दी मला भेटण्यासाठी येतेय. पश्चिम महाराष्ट्रातून जर मोठ्या ताकतीने मराठा समाज येणार असेल तर मराठवाडा विदर्भ देखील त्याच ताकतीने येईल, असा मला विश्वास आहे. असेही जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसीच्या हक्कासाठी लढणार. याचा अर्थ असाच होतो की, मी मराठ्यांसाठी लढणार नाही. ओबीसींच्या हक्कासाठी लढणार, याचा अर्थ मराठ्यांच्या गोरगरीब जनतेसाठी तुम्हाला लढायचं नाही का? असा सवाल जरांगे पाटील यांनी यावेळी केला. संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती जर ओबीसींसाठी लढणार असतील तर मराठ्यांसाठी लढणार नाही, असा याचा अर्थ होतो.
मराठ्यांनो, आता जागे व्हा. मराठ्यांच्या मंत्र्यांना घोटाळ्यात क्लीनचीट भेटत नाही. त्यामुळे त्यांचेच नाव खराब होणार आहे. सर्वच पक्षातील मराठा नेते ते संपवायला निघालेत, असं कधी होईल का. देवेंद्र फडणवीस हे भाजप संपवायला निघालेत. भाजपसाठी ही वागणूक पूर्णपणे घातक आहे. त्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी मोठी पावर ॲक्शन कमिटी केली पाहिजे.
धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही, त्यांना मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, याबाबत पत्रकारांनी मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, ते स्वप्नातही आणू नका. मंत्रिपदाचे सोपे नाही. अजितदादांचा पूर्ण पक्षच संपेल. इतके क्रूर हत्या घडवून आणणारे, गुंड सांभाळणारे, पुन्हा मंत्री केले, तर पक्ष संपेल ना. असं जरांगे पाटील म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.