

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोची धडक
माळशेज घाट अपघातात चार जण जखमी
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात
रोहिदास गडगे, साम प्रतिनिधी
अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरून एसटी बस प्रवास करत असताना माळशेज घाटातील एका ठिकाणी समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोसोबत तिची समोरासमोर धडक झाली. घाटातील अरुंद रस्ता आणि वळणांचा भाग असल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींची प्रकृती आणि त्यांची ओळख याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, अपघातामुळे माळशेज घाटातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
घाटातील रस्ता अरुंद असल्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
माळशेज घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सध्या सावधगिरीने वाहन चालवावे आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.