राज्यात वातावरण अस्थिर असून पावसाची शक्यता
३१ मार्च रोजी अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
गारपीट आणि वादळी वाऱ्याचा धोका
शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन
सचिन जाधव, पुणे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून अनेक भागांमध्ये मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, वादळी वारे, गारपीट व हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग ३० ते ६० किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. आज म्हणजेच ३१ मार्च रोजी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे गारपीट व वादळी पावसाचा धोका जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची सर्व कामे नियोजनपूर्वक करावीत व पिकांचे संरक्षण करावे.
आज म्हणजेच ३१ मार्च रोजी हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम असून येत्या १ एप्रिल रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या सतर्कतेनुसार, २ एप्रिल रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदुरबार, धुळे, ठाणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, नंदुरबार, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे. शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे. वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत. शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून अवकाळी पावसापासून आपल्या पिकांचे रक्षण करावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.