मुसळधार पावसामुळे वंदे भारत, सिद्धेश्वर व होसपेट एक्स्प्रेस रद्द
मुंबईहून सुटणाऱ्या हैदराबाद, चेन्नई व भुवनेश्वर गाड्या तासन्तास उशिरा
प्रवासी सोलापूरसह विविध स्टेशनवर अडकून, बसेस व खाजगी वाहनांचा आधार
रेल्वे प्रशासनाचा सल्ला : प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासा, सुरक्षिततेला प्राधान्य
मुंबईसह अनेक शहरांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही बसला आहे. अनेक गाड्या उशिराने धावत आहेत, तर काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई, पुणे, सोलापूर तसेच दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरची लोकप्रिय सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही मंगळवारी रात्री मुंबईऐवजी पुणे येथेच थांबवण्यात आली. नेहमीप्रमाणे ही गाडी सकाळी ११ वाजता सोलापुरातून सुटून संध्याकाळी ८.१५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचते. त्यानंतर त्याच रेकमधून सिद्धेश्वर एक्स्प्रेस परतीचा प्रवास रात्री १०.४० वाजता सुरू करते. मात्र, मुसळधार पावसामुळे काल या गाडीचा मुंबई ते पुणे हा टप्पा रद्द करण्यात आला. परिणामी सोलापूरसाठी नियोजित वेळेत गाडी धावविण्यासाठी ती मंगळवारी मध्यरात्री २.२० वाजता पुण्यातून सुटली.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस देखील पूर्णपणे रद्द करण्यात आली. त्यामुळे बुधवारी सकाळी सोलापूरातून सुटणारी वंदे भारत गाडी प्रवासाला निघालीच नाही. प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, अनेकांनी आधीच आरक्षण केले होते. अचानक गाडी रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली.
याशिवाय, मुंबई-सोलापूर-होसपेट ही गाडी देखील रद्द करण्यात आली आहे. तर मुंबईहून सुटणाऱ्या इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मोठा विलंब होत आहे. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस जी मंगळवारी दुपारी २.१० वाजता सुटली पाहिजे होती, ती तब्बल नऊ तास उशिराने रात्री ११.१० वाजता सुटली. त्याचप्रमाणे मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस जी दुपारी १२.४५ वाजता सुटते, ती मध्यरात्री १२.०५ वाजता सुटली. मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस ही देखील वेळापत्रकापेक्षा जवळपास नऊ तास उशिराने रात्री ११.३० वाजता सुटल्याचे ऑनलाइन वेळापत्रकात दाखवले गेले.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे मुंबईतील काही महत्त्वाच्या मार्गांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी येऊन गाड्या चालविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन गाड्या रद्द किंवा उशिराने धाववल्या जात आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तासांत आणखी पावसाचा इशारा दिल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे संकेत आहेत.
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर जाण्यापूर्वी ऑनलाइन वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसामुळे अद्याप दोन दिवसांपर्यंत गाड्या वेळेवर धावतील की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे. परिणामी, मुंबई, पुणे, सोलापूर आणि दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगामी काही दिवस मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.