विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Solapur Crime News Update : सोलापूर जिल्ह्याची ओळख आजवर पश्चिम महाराष्ट्रातील 'दुष्काळी जिल्हा' म्हणून राहिली आहे. मात्र, आता दुर्दैवाने सोलापूरची ही ओळख 'रक्तरंजित सोलापूर' होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या अवघ्या ७२ तासांत सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात तब्बल ६ निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अवघ्या तीन दिवसांत सहा हत्या झाल्याने सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
उळेगावात रक्ताचा सडा (१ मे):
१ मे रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव (शिवाजी नगर) येथील रहिवासी संजय विठ्ठल शिंदे (वय ५४) यांची अज्ञात कारणावरून गळा चिरून हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपीने त्यांच्या मानेवर शस्त्राने खोल वार केले होते. कामगार दिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने उळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
वैरागमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा अंत (२ मे):
दुसरी घटना बार्शी तालुक्यातील वैराग शहरात घडली. शनिवारी २ मे रोजी वैरागच्या दत्तनगर परिसरात दिनेश उर्फ अप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१) या तरुणाचा डोक्यात दगड घालून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला. भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे बार्शी तालुक्यात तणावाचे वातावरण पसरले होते.
बोरामणीत तिहेरी हत्याकांड: एकाच कुटुंबाचा घात (२ मे):
वैरागची घटना ताजी असतानाच, २ मे रोजी रात्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातून काळजाचा थरकाप उडवणारी बातमी आली. येथे एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची मुलगी प्रिया मस्के (वय १८) आणि मुलगा शिवराज मस्के (वय १६) या तिघांचा बळी गेल्याने संपूर्ण जिल्ह्याची झोप उडाली आहे. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याची चर्चा आहे.
रविवारी सकाळी शहरात थरार (३ मे):
सोलापूर शहरातील गजबजलेला भाग असलेल्या सत्तर फूट रोड परिसरात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा एकदा रक्ताने जमीन माखली. माधन नगर येथे सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५, रा. नीलम नगर) यांची ६ जणांनी मिळून डोक्यात दगड घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केली. दिवसाढवळ्या झालेल्या या खुनामुळे शहरात भीतीचे सावट पसरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.