अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे निलंबित
रद्द झालेल्या लेआउटला पुन्हा मंजुरी दिल्याच्या प्रकरण भोवलं
विजय लोखंडे यांच्या जागी संतोष आठरे यांची अमरावती तहसीलदार म्हणून नियुक्ती
अमर घटारे, अमरावती
रद्द करण्यात आलेल्या लेआउटला पुन्हा मंजुरी दिल्याप्रकरणी अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्यावर महसूल विभागाने निलंबनाची कारवाई केली . २२ मे २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी गोपालनगर येथील संजय गव्हाळे यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाची दखल घेण्यात आली. विजय लोखंडे यांच्या जागी आता संतोष आठरे यांची अमरावती तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडद परिसरातील दोन लेआउटची मंजुरी अमरावती महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी २३ जून २०२३ रोजी रद्द केली होती. मात्र, मंजुरी रद्द झालेली असतानाही या लेआउटला पुन्हा परवानगी मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच १५ मार्च २०२४ रोजी दोन्ही लेआउटच्या मंजुरीसाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे अर्ज करण्यात आला.
त्यानंतर अवघ्या चार दिवसांत म्हणजे १९ मार्च २०२४ रोजी या दोन्ही लेआउटला पुन्हा मंजुरी देण्यात आली. या प्रक्रियेत तहसीलदार विजय लोखंडे यांनी एनओसी दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या लेआउटला पुन्हा मंजुरी देताना आवश्यक नियम आणि प्रक्रियेचे पालन झाले का, असा प्रश्न तक्रारदाराने उपस्थित केला होता.
नगररचना विभागातील अधिकारी आणि तहसीलदार यांनी घाईघाईने मंजुरी दिल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची भूमिकादेखील संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. या सर्व प्रकाराची तक्रार संजय गव्हाळे यांनी महसूल विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाने तहसीलदार विजय लोखंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, अमरावती तहसीलदारपदाची जबाबदारी आता संतोष आठरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.