यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अभूतपूर्व पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांना याचा फटखा बसला. मात्र यवतमाळ तालुक्यातील निसर्गाच्या खुशीत वसलेल्या कापरा या गावातील अनेक घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली तर 80 टक्के घरांची पडझड झाली. त्यामुळे गावातील अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कापरा येथील नागरिक उपाशी आणि उघड्यावर आहेत. गावात अतिशय भीषण प्रस्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे चिखली ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देत गाव सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावकऱ्यांनी ताबडतोब आपलं प्रापंचिक साहित्य आणि जनावरं घेऊन सोनतळी या परिसरात जावे असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज दरडग्रस्त इर्शाळवाडी गावाला भेट देवून पाहणी केली. तेथील दरडग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
यावेळी बोलताना आठवले म्हणाले, राज्याच्या दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या कुटुंबांचे कायमस्वरुपी सुरक्षित पुनर्वसन करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने समिती स्थापन करायला हवी अशी सूचना आठवले यांनी केली. याबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितलं. या ठिकाणी बचाव आणि शोध यंत्रणांनी केलेल्या कामाचंही त्यांनी कौतुक केलं.
यवतमाळ जिल्ह्यात संकटाची मालिका थांबता थांबेना. दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल एक लाख हेक्टर शेतजमिनीवरील पिकं खरडून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आणि कापूस, सोयाबीनला भाव न मिळाल्याने शेतकरी खचून गेले होते. त्यातून कसेबसे सावरत यंदा पेरणी केली. आधीच उशिरा झालेली पेरणी आणि आता सतत कोसळत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेती जलमय झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसानं सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडुन काही भाग खचला असल्याचं निदर्शनास आलय. यामुळं याठिकाणच्या लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलय. प्रशासन या ठिकाणी पोहोचुन लोकांना शेल्टर मध्ये राहण्याची विनंती करता येत आहे.
मोरेवाडी गावावर सध्या भितीचं वातावरण पाहायला मिळतय गावाच्या लगत असणा-या डोंगरालाच मोठ्याला भेगा पडल्यामुळं गावावर हे संकट काळ बनून उभं असल्याचं पाहायला मिळतय. डोंगराला भेगा पडल्यामुळं या ठिकाणीचे भले मोठे दगड देखील अनेक फुट पुढे सरकलेत. नेहमी या ठिकाणी येणाऱ्या लोकांनी हे पाहिल्यानंतर गावात भितीचं वातावरण पसरलय. मोरेवाडी गावातील 23 कुटूंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत. मात्र शेल्टरमध्ये या लोकांना हलवलं असलं तरी प्रत्येक पावसाळ्यात मृत्यू आमच्या डोक्यावर काळ बनून बसलेला असतो असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलंय. इर्शाळवाडी सारख्या दुर्घटनेला सामोरं जाण्याआधी आमचं कायमचं पुणर्वसन करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मागील दोन दिवसात अमरावतीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे आमदार यशोमती ठाकूर अधिवेशन सुट्टीत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्यात. नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघातून जाणाऱ्या पेढी नदीला महापूर आल्याने शेकडो हेक्टरवरील शेती खरडून निघाली आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने पूर संरक्षण भिंत व्हायला हवी अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.
विदर्भात मोठे नुकसान झालं असताना कोणीही पाहायला आला नाही, पश्चिम महाराष्ट्रात जर नुकसान झालं असतं तर सगळेजण तुटून पडले असते. मात्र विदर्भात नुकसान झालं तर कोणी बघायला तयार नाही याचं वाईट वाटते, विदर्भाचं सरकारला गांभीर्य नाही, अशी खंत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
संततधार पावसाने नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पूर आलाय. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतीतील पीकं पाण्याखाली गेली आहेत. सातत्याने तीन दिवसांपासून शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिकांना बुरशी चढल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.. दरम्यान याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन हे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत.
पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत
गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
जिल्ह्यातील 22 मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद
नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने 6 राज्य मार्ग तर 16 जिल्हा मार्ग बंद
मार्ग बंद झाल्याने 25 ठिकाणी वाहतुकीवर परिणाम
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यवतमाळ जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पुरात अडकलेल्या 81 जणांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या NDRF आणि SDRF च्या टिमचं त्यांनी कौतुक केले. यावेळी
रत्नागिरीच आज पावसाचा जोर अधिक
जिल्ह्यातील जगबुडी, शास्री, कोदवली नद्या इशारा पातळीवर
आज देखील मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश
पालीतील सरस गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाघजाई नगर इथं दरड कोसळल्यामुळे तेथील घरांना धोका निर्माण झालाय. पालीच्या मुख्याधिकारी विद्या येरूणकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश मपारा यांनी वाडीवर जावून तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला आणि स्थलांतर करण्याची विनंती केली. त्यानंतर तेथील 11 कुटुंबातील 60 जणांचे स्थलांतर करण्यात आली असून त्यांची व्यवस्था भक्त निवास इथं करण्यात आलीय.
मुसळधार पावसामुळे संग्रामपुर, जळगाव जामोद तालुक्यातील सर्वत्र शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो एकर जमीन पिकांसह खरडुन गेली,अनेक शेतातील स्प्रिकंलर संच, ठिबक सिंचन पाण्याच्या प्रवाहाने वाहुन गेले. अनेक जणावरे पुराच्या पाण्याने वाहुन गेले, काही गावात पाणी शिरल्याने घरे वाहुन गेले. घरांची पडझडही मोट्या प्रमाणात झाली आहे. यासर्व झालेल्या नुकसानीची शेतकरी आणि शेतमजुरांना सरकारने मदत देण्यासाठी पंचनामे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पालघर_पालघर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसात मुसळधार असा पाऊस पडत असून जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या धामणी धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 80.64 टक्क्यांनी भरलं असून वसई विरार महानगरपालिका, तारापूर औद्योगिक वसाहत तसेच जिल्ह्यातील प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटलेला आहे. धारण क्षेत्रात सरासरी 2284 मिलिमीटर पाऊस आतापर्यंत पडला आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं जळगाव जामोद शहराजवळी गौराळा धरण धोकादायक बनलं आहे. या धरणातून लिकेच होत आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह बघून कुणालाही धडकी भरेल. गौराळा धरण हे मातीचे असून जळगाव जामोद पासून ६ किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. या धरणाला अनेक ठिकाणी लिकेजेस असल्याची माहिती आज तहसीलदार यांनी प्रशासनाला दिली. त्यामुळे या धरणावर आता प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल आहे. मानोरा तालुक्यात काल झालेल्या दमदार पावसाने खुराडी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरात शेती परिसरातील अनेक शेतातील पीक अक्षरशः खरडून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
लोणावळ्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने येथील निसर्ग सौंदर्य बहरलंय. सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे आणि त्याचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्गाची सुंदरता आकर्षित करत आहे. पुणे मुंबईकरांच्या जवळपास असलेल्या लोणावळ्यात पर्यटक वर्षाविहार करण्यास आल्यावर येथील नैसर्गिक धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांनी लोणावळ्यातील पाऊस आणि येथील वातावरणाचा आनंद घेत आपला विकेंड साजरा केला..
अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच....
अमरावती जिल्ह्यात काल पुरात वाहून तिघांचा मृत्यू...
१६ हजार हेक्टरवर सोयाबीन, कपाशी, तूरीसह शेती पिकांचं नुकसान
पावसामुळे ४३५ घरांची पडझड, अनेक गावातील रस्ते गेले वाहुन...
हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ९ दरवाजे उघडले
दहा दिवस पावसाची रिपरिप कायम राहण्यचा अंदाज
यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील लाखो हेक्टर शेतजमीन जमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा तडाखा बसला. तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पूरपरिस्थितीत काही प्रमाणात कायम असल्याचे चित्र आहे. अडाण, अरुणावती नदी भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठावरील शेत जमीन पूर्ण पाण्याखाली असल्याचे चित्र आहेत.
मुंबईत पावसाचा जोर कायम असून आज रविवारी देखील मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पहाटे पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळपासून पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दिवसभर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबईतील सात तलावांमध्ये 48 टक्के पाणीसाठा जमा झाला असून मुंबईला दररोज होणारा पाणीसाठा पाहता हे पाणी जानेवारीपर्यत पुरणारे आहे.आता मुंबईत सुरु असलेला जोरदार पाऊस मुंबईत असाच सुरु राहिल्यास येत्या काही दिवसात पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.1 जुलैपासून मुंबईमध्ये 10 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.
मुंबईतील पाण्याची सध्याची स्थिती
अप्पर वैतरणा -43 हजार 657 दशलक्ष लिटर (19.20 टक्के)
मोडक सागर - 96 हजार 919 दशलक्ष लिटर (75.17 टक्के)
तानसा - 1 लाख 25 हजार 717 दशलक्ष लिटर (86.66 टक्के)
मध्य वैतरणा - 10 लाख 8 हजार 816 दशलक्ष लिटर (56.23 टक्के)
भातसा - 28 लाख 3 हजार 984 दशलक्ष लिटर (39.61 टक्के)
विहार - 21 हजार 2 दशलक्ष लिटर (75.82 टक्के)
तुळशी - 8 हजार 46 दशलक्ष लिटर (100 टक्के)
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
कोल्हापूर गगनबावडा मार्गे कोकणात जाणारा महामार्ग बंद
कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर मांडूकली इथं 3 फूट पाणी
कळे ते गगनबावडा या मार्गावरील वाहतूक बंद
जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम
कोल्हापूरची तहान भागवणाऱ राधानगरी धरण 81.07% भरलं
राधानगरी धरणातून प्रतीसेकंद 1400 क्यूसेक पाण्यचा विसर्ग नदीपात्रात सुरू
जिल्हा प्रशासन सतर्क
कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप तर पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर
जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या पात्राबाहेर
79 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू
पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पंचगंगा नदीची संथ गतीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरूच
जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश
पंचगंगेची पाणीपातळी 37 फुट 03 इंचावर
पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे
जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली, १४ प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे. येथे मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं असून दिवसाही धुक्यात चिखलदरा हरवून गेलं आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मुसळधार पावसामुळे मेळघाट चांगलचं सौंदर्य खुलून गेलं आहे. सगळीकडे हिरव्यागार डोंगररांगा जणू हिरवा शालू पांघरून पर्यटकांना खुणावत आहे. सौंदर्याने नटलेल्या चिखलदऱ्याची ही दृश्य पाहून पर्यटक खूश होत आहेत.
साताऱ्यातील धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून धरणा मध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे 2000 क्युसेक पाण्याचा कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणा खालील मौजे बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील ग्रामस्थांना नदी पात्रात जावू नये. तसेच त्यांनी जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे. धोम बलकवडी धरण ९५ टक्के भरले असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
वाशिमच्या मानोरा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील धानोरा घाडगे येथील गावत झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. पुराच पाणी पूर्णपणे शेतांमध्ये शिरलं असून सध्या परिसरात शेती मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात आजपासून पाऊस कमी पडणार आहे. आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय घाट भागात मुसळधार तर इतर भागात तुरळक ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहरी भागामध्ये पावसाचा जोर जरी मंदावला असला, तरी महाबळेश्वर पाचगणीसारख्या डोंगरी भागात मात्र पावसाची सरासरी जास्त आहे. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा लेक तलाव या पावसाने तडुंब भरला आहे. तीन दिवसांपूरवीच हा तलाव भरून पाणी रस्त्यावर आल्याने महाबळेश्र्वर पाचगणी रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सद्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि धुकं असल्यामुळे वेण्णा लेक तलाव पर्यटकांसाठी पूर्ण पणे बंद आहे.
कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला आज ऑरेन्ज तर विदर्भाला यलो अलर्ट
मुसळधार पावसामुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती
सतत सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत
राज्यात अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत
मुसळधार पावसामुळे मुंबईसह राज्यभरात वाहतूकीवर परिणाम
दरड कोसळून दुर्घटना झालेल्या खालापूर तालुक्यातील इरसाल वाडी येथील मदत आणि बचाव कार्य आजही सुरूच राहणार आहे. दरम्यान परिस्थिती पाहून आज संध्याकाळ पर्यंत हे काम कायमचे थांबवले जाण्याची शक्यता आहे. बचाव यंत्रणांनी शनिवारी संध्याकाळ पर्यंत 27 मृतदेह शोधून काढले होते तर 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे. प्रशासनाच्या माहिती नुसार अद्याप 78 जण बेपत्ता आहेत. सध्या या ठिकाणी कोसळत असलेला पाऊस त्यामुळे मदत कार्यात येणारे अडथळे आणि तिथं निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न लक्षात घेवून मदत कार्य आज थांबवून तळीये प्रमाणे इथं देखील बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.