महाराष्ट्रात मॉन्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीट वाढली
गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता
सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातही विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
Maharashtra Heatwave Update News मॉन्सून आता परतीच्या प्रवासाला लागला असताना महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून, दुसरीकडे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. मॉन्सून माघारीनंतर जाणवणाऱ्या या उष्णतेला ‘ऑक्टोबर हीट’ म्हटले जाते. सध्या राज्यात याच ऑक्टोबर हीटचा प्रभाव जाणवू लागला आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात हवामान काहीसे अस्थिर राहण्याची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. राज्यातील उर्वरित भागात मात्र आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, उन्हाचा चटका अधिक जाणवू शकतो. त्यासोबतच वातावरणातील उकाडाही वाढण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनच्या परतीच्या काळात राज्यातील काही भागांत पाऊस आणि काही भागांत कडक ऊन, असे परस्परविरोधी हवामान अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतही हवामानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.