महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढला
काही जिल्ह्यात पाऊस तर काही जिल्ह्याच कडाक्याचे ऊन
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा
परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल
राज्यात सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. एकीकडे शेतकरी यंदा चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे चिंतेत आहे. तर दुसरीकडे परतीचा पाऊस शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देताना दिसत आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये परतीच्या पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यामध्ये आज ढगाळ हवामान राहिल. त्याचसोबत अनेक जिल्ह्यामध्ये ऊन सावल्यांच्या खेळासोबत उन्हाचा चटका लागण्याची शक्यता आहे.
राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यात कमालीचा उकाडा वाढला आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. अशामध्ये ऑक्टोबर हिटचा देखील त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका वाढला आहे. सूर्य आग ओकत असल्याममुळे घराबाहेर पडणं देखील कठीण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.
पावसाने दडी मारल्यानंतर राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मालेगावमध्ये बुधवारी राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये १७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सांगलीच्या तासगाव येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.