

शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शेखर गोरे हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत.
हा पक्षप्रवेश सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापलंय.त्याचदरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. येथील ठाकरे गटातील बड्या नेत्यानं शिंदे गटात प्रवेश केलाय. साताऱ्यातील माण-खटावमध्ये हा राजकीय भूकंप झाला असून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीआधी शिंदेच्या खेळीनं राजकारणात खळबळ माजलीय.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय.शेखर गोरे हे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत.सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शेखर गोरेंच्या शिवसेना प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. या राजकीय घडामोडीनंतर जयकुमार गोरे आणि उद्धव ठाकरेंचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.आगामी निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षातून दोन सख्खे भाऊच एकमेकांच्या विरोधात उभे राहणार असल्याचे चित्र दिसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी बोलताना, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आज राज्यात विकासाला गती देत आहे. २०२२ साली जनतेने आशीर्वाद दिला आणि आम्ही ऐतिहासिक उठाव केला. त्यानंतर अडीच वर्षे राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम केले. आया बहिणींच्या कल्याणासाठी लाडकी बहिण योजनेसारख्या अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे जनतेनी पुन्हा २०२४ साली महायुतीला विजयाची पोचपावती दिली.आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून राज्यात महायुतीचे २३४ आमदार निवडून आले.
शिवसेना ही कायमच दिलेला शब्द पाळणारी आणि विकासाचा अजेंडा समोर ठेवून काम करणारी संघटना आहे. त्यामुळेच शिवसेना आज राज्यातच नव्हे तर देशभरात वेगाने पुढे मार्गक्रमण करत आहे. उबाठा गटाचे संपर्क प्रमुख शेखर गोरे त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेवर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
शेखर गोरे यांना त्यांना लोकांना न्याय द्यायचा असल्याने त्यांनी आज शिवसेनेवर विश्वास ठेवून पक्षात पक्षप्रवेश केला आहे. त्यांनी माझ्या नेतृत्वावर आणि पक्षावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असेही शिंदे यांनी सांगितले. शेखर गोरे यांच्यामुळे सातारा जिल्ह्यात माण खटाव भावात शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू होईल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाना मी काल येऊन भेटलो आणि आज लगेचच माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा आज पक्षप्रवेश होत असल्याचे गोरे यांनी सांगितले. मी ज्यावेळी ज्या पक्षात गेलो त्यावेळी पूर्ण जोमाने त्या पक्षासाठी काम केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊनही मी जिल्हा बँकेचा संचालक झालो होतो. आता मात्र मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सक्रीय झालो असून साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचे आहे. मला शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे, तुम्हाला जेवढी शिवसेना वाढवायची आहे तेवढी मी सातारा जिल्ह्यात नक्की वाढवून देईन असा शब्द यावेळी शेखर गोरे यांनी शिंदे यांना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.