
Mahayuti Politics : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनाला उद्या सुरुवात होणार आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी महायुतीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचेही म्हटले.
एकनाथ शिंदे म्हणाले, 'महायुती सरकारचं दुसरं अधिवेशन आहे. पहिल्या अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे. आमची टीम जुनीच आहे, फक्त फडणवीस आणि माझ्या खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. अजितदादांची खुर्ची मात्र फिक्स आहे. अडीच वर्षात महायुतीने चांगलं काम केलं म्हणून आम्हाला विजय मिळाला. मोठा विजय झाल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे.
महायुतीमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा होत असतात. यावरही एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, 'मला एवढं सांगायचंय, मुद्दाम चर्चा होतात. ज्यांच्यावर विश्वास नाहीये ते काहीही बातम्या देतात. त्याच बातम्या छापल्या जातात. काहीही झालं तरी आमच्यामध्ये काही ब्रेक होणार नाही. कोल्ड वॉर.. कोल्ड वॉर.. कुठलं काय कुठं आहे का कोल्ड वॉर? उन्हाळ्यात कुठं कोल्ड वॉर. इथं सगळं थंडा थंडा कूल कूल आहे.'
'दररोज चर्चा होत असतात. आतापर्यंत अडीच वर्षांमध्ये अनेक आरोप केले. ते लोक म्हणाले, निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं. सुप्रीम कोर्टावर आरोप केले. ईव्हीएम मशीनवर आरोप केले. जेव्हा ते जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगली, जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएला दोष देतात. आम्ही आरोपांना कामाने उत्तर देत आहेत. मुद्यावरुन त्यांनी चर्चा करावी पण सूड भावनेतून टीका केली तर त्याला तसचं उत्तर दिलं जाईल. तेच ते रडगाणं गाण्याऐवजी आमच्यासोबत विकासगाणं गावं' असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
'आमच्या अजेंडा खुर्ची मिळवलं नाहीये. सत्ता मिळवणं, स्वत:चा स्वार्थ साधणं हा आमचा अजेंडा नाहीये. आमचा अजेंडा ठरलेला आहे. आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं हा मोठा विषय आहे. आम्ही चुकलो तर तुम्ही सांगा, पण जे आरोप सरकारवर होतात ते खरे आहेत की खोटे आहेत याची शहानिशा केली पाहिजे', असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.