नांदेड, ता. २६ ऑगस्ट २०२४
राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. नांदेडचे खासदार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे दुःखद निधन (Vasant Chavan Dies) झाले आहे. आज मध्यरात्री वसंत चव्हाण यांची प्रकृती बिघडली होती. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने हैद्राबाद येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत चव्हाण यांच्या निधनच्या बातमीने राजकीय वर्तुळासह नांदेड (Nanded News) जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे दुःखद निधन झाले आहे. वसंत चव्हाण यांना गेल्याच आठवड्यामध्ये श्वास घेण्याचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना घरी आणले होते. मात्र त्यानंतर आज मध्यरात्री पुन्हा अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने हैद्राबाद येथील किम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून दिग्गज नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंत चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने नांदेडमधून उमेदवारी दिली होती. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतरही वसंत चव्हाण हे काँग्रेससोबत कायम होते. इतकेच नव्हेतर त्यांनी नांदेडमध्ये लोकसभेला सर्वांनाच धक्का देत विजय खेचून आणला होता.
काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेल्या वसंत चव्हाण यांनी सरपंच ते खासदार असा राजकीय प्रवास केला आहे. 1978 मध्ये वसंत चव्हाण नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यांनी जिल्हापरिषद, विधान परिषदेवरही काम केले. २०१४ मध्ये वसंत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खासदार होण्याआधी त्यांनी नायगाव मतदारसंघातून अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवत विजय मिळवला होता. २००९मध्ये पहिल्यांदा या विधानसभा मतदार संघाची निर्मीती झाल्यानंतर पहिले आमदार होण्याचा मानही वसंत चव्हाण यांनी मिळवला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.