चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार पदावरून हटवले
प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली उमेदवार यादी बदलल्याचा आरोप
१० हून अधिक उमेदवार बदलल्याची चर्चा
प्रदेश कार्यालयाकडून तत्काळ प्रभावाने कारवाई करण्यात आली
चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठ राजकीय घडामोड घडली आहे. भाजपने मोठा निर्णय घेत बड्या नेत्याला पदावरून तडकाफडकी हटवले. भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षांनी तयार केलेली उमेदवार यादी बदलणे भोवले असल्याची चर्चा चंद्रपूरमध्ये सुरू आहे. भाजपच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना आज तडकाफडकी पदावरून काढून टाकण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली यादी सुभाष कासनगोट्टुवार यांनी आपल्याच मताने बदलून टाकली. त्यांनी १० पेक्षा अधिक उमेदवार बदलून टाकले. प्रदेशाध्यक्षांचा हा अवमान असल्याने पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि आता त्यांना चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदावरून तत्काळ प्रभावाने हटवण्यात आल्याचे पत्र जारी केले आहे.
प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी सुभाष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवल्याचे पत्र जारी केले आहे. वर्षभरापूर्वीच कासनगोट्टुवार यांची या पदावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या नियुक्तीला मोठा विरोध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून झाला होता. त्यांच्या कारवाया नेहमीच पक्षात वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यांचे शहाणपण आणि आगाऊचे धाडस त्यांच्या अंगलट आल्याची प्रतिक्रिया पक्षात उमटत आहे. ऐन निवडणुकीत भाजपमध्ये सुरू असलेला हा गोंधळ पक्षाला डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.