मुलुंडमध्ये शिवसेना शिंदेगटाला मोठं खिंडार
महिला विभाग प्रमुखासह माजी नगरसेविकांचे तडकाफडकी राजीनामे
चार वॉर्डमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
भाजप–शिंदे युतीसाठी निवडणुकीआधी धोक्याची घंटा
मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. जागा वापटावरून झालेल्या वादानंतर महायुतीमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुंबईतल्या मुलुंडमध्ये भाजपपाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील महिला विभाग प्रमुख आणि माजी नगरसेविका सुजाता पाठक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माजी नगरसेविका सुनंदा सुरेश पाटील, उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड, ईशान्य मुंबई युवासेना विभाग प्रमुख गुरुजोत सिंग किर आणि इतर महत्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. पालिका निवडणुकीदरम्यान हा एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सत्ताधारी पक्षातील भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्हीही पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राजीनामा दिल्यामुळे मुलुंडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. भाजपच्या आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनामामुळे तेथील भाजपच्या उमेदवारांना निवडणूक विजयात अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण उमेदवारासोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे निवडून येण्याची शक्यता आहे.
मुलुंडमध्ये एकही जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. या नाराजीचा परिणाम बंडखोरीतून समोर आला असून मुलुंड विधानसभेतून चार वॉर्डमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुलुंड विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १०६ मधून उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड, वॉर्ड १०५ मधून सुजाता पाठक, वॉर्ड १०८ मधून गायत्री संसारे तसेच वॉर्ड १०३ मधून सुनंदा पाटील आणि मनींदर कौर कीर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत.
मुलुंडमध्ये शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी हा कठोर निर्णय घेत अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. हा निर्णय पक्षाच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे मत उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. मुलुंडमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील राजीनामा सत्राचा परिणाम याठिकाणच्या निवडणूक निकालावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.