

विधान परिषद निवडणुकीआधी महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग
उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली
काँग्रेसमध्ये नाराजी, आघाडीत तणाव वाढला
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाआधी राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होताना दिसत आहे. भाजपने आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केल्यानंतर शिंदे गटानेही हालचाली वाढवल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीवरून मविआने पाण्यात घोंगडी भिजत ठेवली होती. आज उमेदवारीवरील सस्पेन्स अखेर संपला.
उमेदवारीचा सस्पेन्स आज संपला खरा पण दुसरीकडे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा मात्र जोरात सुरू झाली आहे. त्याचे कारण ठाकरेंनी स्वत: निवडणूक न लढवता अंबादास दानवे यांना संधी दिली. मात्र उद्धव ठाकरेंचा हा निर्णय काँग्रेसच्या नेत्यांना आवडला नाहीये. काँग्रेसमधील नेत्यांनी आपली नाराजी वर्तवली आहे. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांचे नाव उमेदवारीसाठी जाहीर केल्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.
ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषदेवर जावं अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची इच्छा होती. त्यात, ठाकरे गटातील नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्याच नावाचा आग्रह धरला होता. पण उद्धव ठाकरेंनी आपलं वजन अंबादास दानवे यांच्या पारड्यात टाकलं त्यामुळे आता ते ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असतील. मात्र अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना आपण महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याचे म्हटले. परंतु काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. काँग्रेसनं आपला उमेदवार देण्याचा भूमिका दाखवली आहे. जर उद्धव ठाकरेंनी विधान परिषद निवडणूक लढवली असतील काँग्रेसने पाठिंबा देऊ. अशी काँग्रेसची भूमिका होती. परंतु ठाकरेंनी दावनेंना उमेदवारी देण्याचा निर्णय हा त्यांनी चर्चा न करता केला घेतला.
त्यामुळे जर पक्षश्रेष्ठींना वाटलं तर काँग्रेस आपला उमेदवार देईल, अशी प्रतिक्रिया विजय वडेवट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली होती. त्यानंतर काँग्रेसमधील ७ नेत्याची नावे चर्चा देखील सुरू झाली. परंतु जर काँग्रेसनं उमेदवार दिला तर, महाविकास आघाडीत फूट पडेल. आणि त्याचा फायदा कदाचित भाजप घेईल. म्हणजे भाजप सहावा उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. तर १२ मे रोजीच निकाल जाहीर होईल. विधानसभेतील बलाबल पाहता भाजपच्या वाट्याला ६, शिवसेनेला २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १ जागा येणार आहे.
विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. ते गणित पाहता भाजप अजून एका उमेदवाराची घोषणा करू शकतो. भारतीय जनता पक्षाने आधीच ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.
तर आज म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाआधी ठाकरेंनी उमेदवारीचा पत्ता उघडला आणि अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र उद्धव ठाकरेंहा हा निर्णय महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला आवडला नाहीये. उद्धव ठाकरेंनी दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसनेही आपला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीत आहेत. तेथील वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ते उमेदवारांची घोषणा करू शकतात.
दरम्यान ठाकरे गट आणि काँग्रेसच्या अंतर्गत वादात भाजपने फायदा घेण्याची तयारी केल्याची चर्चा सुरू आहे. भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत भाजप केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे आता भाजपचा सहावा उमेदवार कोण असणार याची चर्चा रंगू लागली आहे. कारण राज्यातील नेत्यांनी ३० उमेदवारांची यादी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवली होती. भाजपने सध्या पाच उमेदवार जाहीर केले आहेत. अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्याने विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीत भाजपकडे १३१ आमदार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५७ आमदार आहेत. अजित पवार गट राष्ट्रवादीचे ४० आमदार आहेत. यानुसार महायुतीचे ९ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.