

फुलंब्री नगरपंचायतीमध्ये मोठी राजकीय घडामोड
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का
नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे शिंदे गटात प्रवेश करणार
उद्धव ठाकरे गटाच्या ७ नगरसेवकांचा देखील आज शिंदेसेनेत प्रवेश
राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. फुलंब्री नगरपंचायतीच्या राजकारणात आज मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्षांसह ७ नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. हे सर्व जण आज शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे ७ नगरसेवकांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नगराध्यक्ष ठोंबरे यांनी समर्थक नगरसेवकांसह शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच घेतल्याचे सांगण्यात येते आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या दोन बैठका झाल्या होत्या. अखेर आज ते धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणि विविध विकासकामांबाबत ठोंबरे यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र, आता अडथळे दूर झाल्याचे सांगण्यात येत असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सत्ताधारी गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे ठोंबरे समर्थकांचे म्हणणे आहे. या पक्षप्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे ठाकरेंचे १४ आमदार फोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवरात्रीच्या म्हणजे घटस्थापनेच्या आधी ठाकरेंचे १४ आमदार शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरेंच्या १४ आमदारांना शिवसेना शिंदे गटामध्ये आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.