कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी हिल पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
'महाराष्ट्र भाजप पुरस्कृत खोके सरकारने काबीज केला. आताच्या कायदा आणि सुव्यवस्थेची ही एक झलक,' असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला. यामध्ये त्यांनी गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरेंचे ट्वीट...
"काल रात्री एका भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्यांवर 5 गोळ्या झाडल्या. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत शिंदे गटाच्या आमदाराने हातात बंदूक घेऊन मुंबईकरांना धमकावले. नंतर पोलीस ठाण्यात त्याच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. बॅलिस्टिक अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या वर्तनाचे बक्षीस म्हणून त्यांना आता एका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे," अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केली.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याचबरोबर "शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मुलगा नंतर होर्डिंगवर दिसला मात्र पोलीस कारवाई नाही. ठाण्यातील शिंदे टोळीच्या स्थानिक नेत्यांनी IVF उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करून पोटात लाथ मारली, घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांविरुद्ध सोशल मीडिया पोस्ट साठी पोलीस कारवाई नाही," असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
"गेल्या 2 वर्षांत, बनावट व्हॉट्सॲप संदेशांवरून अनेक दंगली उसळल्या आहेत. गुंड व्यवसायांना धमकावत आहेत. दुर्दैवाने, अत्यंत अक्षम आणि बेकायदेशीर उपमुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली ही महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे. या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसं वाटेल?" असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.