भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न दिला, त्याचा मला मनस्वी आनंद झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
प्रखर राष्ट्रभक्त अडवाणी यांनी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे. उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, असंही ते म्हणाले.
लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन आणि प्रणाम. देशाच्या विकासात तुमचे योगदान अविस्मरणीय आहे. प्रभू श्रीराम मंदिर आंदोलनात तुम्ही केलेला संघर्ष सदैव स्मरणात राहील. तुमचं संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित आहे. तुम्ही आमच्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहात, असं फडणवीस म्हणाले.
लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला हा अमाच्यासाठी गौरवाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. आमचे प्रेरणास्त्रोत अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवणं संपूर्ण देशासाठी आणि आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे, असं गडकरी म्हणाले.
भारतीय जनता पक्षाच्या विस्तारात अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांची भूमिका खूपच महत्वपूर्ण आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली हे माझं सौभाग्य आहे. मी पक्षाचा अध्यक्ष असताना अडवाणी यांचं प्रत्येक वेळी मार्गदर्शन मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं होतं, असंही गडकरी यांनी सांगितलं.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. त्याबद्दल आनंद आहे. अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली देशसेवेची शिकवण मिळाली, अशी भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
आज आमच्यासाठी, संपूर्ण देशवासीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. या देशात समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरिता लालकृष्ण अडवाणी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. आमच्या पक्षाचे नेते म्हणून शून्यातून जगातील सर्वात मोठा पक्ष होण्यामध्ये त्यांचं योगदान आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.