Maharashtra Political Crisis Live Updates: ठाण्यात अजित पवार गटाचे समर्थक तरूण आक्रमक

Sharad Pawar vs Ajit Pawar Live Updates: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकारपरिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे.
Maharashtra Political Crisis Live Updates
Maharashtra Political Crisis Live UpdatesSaam TV
Published On

ठाण्यात अजित पवार गटाचे समर्थक तरूण आक्रमक

अजित पवार यांच्या समर्थक गटातील ठाण्याचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या फोटोवर फुल्या आणि जोडे मारून निषेध व्यक्त केला.

अजित पवार काय म्हणाले?

सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यांनी काही निर्णय घेतले

विरोधी पक्षनेता निवड विधानसभा अध्यक्ष करतात.

जास्त सख्या असलेल्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद मिळतं

मात्र आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.

बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत.

महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत राहणार

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय. त्यांच्या पाठिशी उभं राहून राज्याच्या हितासाठी काम करणार

केंद्रात-राज्यात वेगळी सरकारे असतील तर निधी कमी मिळतो

आम्हीच राष्ट्रवादी पक्षाच्या हिताचे करतो आहोत.

त्यांना नोटीस बजावण्याचा अधिकार नाही

पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे.

आमच्यासोबतच्या आमदारांचे भवितव्य किंवा त्यांना कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार माझ्यासोबत - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंंख्य आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी आज केला आहे. यासंदर्भात संभ्रम पसरवला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद

सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले, पटेल यांची घोषणा

सुनील तटकरे हे संघटनेत नियुक्त्या करतील, त्यांना पूर्ण अधिकार

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे राष्ट्रवादी पक्षातून बडतर्फ, शरद पवारांनीच केली कारवाई 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी कारवाई करण्यासंदर्भात शिफारस केल्यानंतर शरद पवार यांनी स्वतःच मोठी कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वात मोठी कारवाई, बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Maharashtra Political Crisis Live Updates
Maharashtra Politics News: मोठी बातमी! अजित पवारांसह ९ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई; शपथविधीला गेलेले सर्व नेतेही बडतर्फ

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर कारवाई होणार; सुप्रिया सुळेंची शरद पवारांकडे शिफारस

अजित पवार यांंच्यासोबत गेलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, अजित पवारांनी केली निवड

अजित पवार म्हणजे पक्ष नाही, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

जे ५० खोक्यांचे आरोप करत होते, तेच शिंदेंसोबत मंत्री झाले - रोहित पवार

शरद पवार यांच्या सोबतीनं आम्हीही लढणार, चांगला विचार घेऊन लढावं लागेल. येत्या ५ तारखेला बैठक होणार आहे. त्यात काय होईल हे बघावं लागेल, असे रोहित पवार म्हणाले. आज राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालं, ते काँग्रेससोबतही होऊ शकतं, असा सावध इशारा रोहित पवार यांनी दिला.

अमोल कोल्हे म्हणाले, मी साहेबांसोबत

अमोल कोल्हे यांनी ट्विट केलं आहे. मी साहेबांसोबत असा हॅशटॅग त्यात आहे. काल त्यांना माहीत नव्हते, आज पहिला मोहरा परतला. काहींना फसवून नेले. साहेबांच्या गैरफायदा घेतला गेला आहे. खोटे बोलून तुम्ही फसवून गेलात. सुरा खुपसला आहे, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी हल्लोबोल केला. ९ सोडून सगळे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला आहे.

मनाला वाईट वाटतंय, राष्ट्रवादी फोडण्याचं पाप भाजपने केलंय - रोहित पवार

अजित पवारांच्या राजकीय भूमिकेवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. दोन भावना आहेत. एक व्यक्तिगत आणि दुसरी काका म्हणून. मनाला वाईट वाटत आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी फोडली, याचं पाप भाजपने केले आहे. काल जे घडलं, त्यानंतर साहेब घरी न थांबता त्यांच्या गुरुंच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक झाले. लोकांचं प्रेम बघितलं. किती लोक आले होते, असं रोहित म्हणाले. शरद पवार साहेब जातील तिकडे लोक आणि आम्ही असू, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

सोलापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, अजित पवारांचे फोटो भिंतीवरून उतरवले

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भिंतीवरील फोटो खाली उतरवले आहेत. तसेच अजित पवारांच्या प्रतिमेवर काळ्या पेनाने गिरवून निषेध नोंदवला आहे. शरद पवारांच्या समर्थनात आणि अजित पवारांच्या विरोधात सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज विधानसभा अध्यक्षांना भेटणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याचे कळते. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रतिज्ञापत्र भरून देणार आहेत. त्यांना त्यासंबंधीचा फॉरमॅट दिला आहे. ५ जुलैच्या बैठकीआधी राष्ट्रवादीकडून पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे.

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांमध्ये खातेवाटपाबद्दल चर्चा

अजित पवार यांनी नवनियुक्त मंत्र्यांसमवेत सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत अजित पवार आणि फडणवीस यांच्यात खातेवाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणती खाती दिली जाणार, यावर खलबतं सुरू आहेत, असे समजते.

अजित पवारांच्या बंडावर राज ठाकरेंना शंका

अजित पवारांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं. पटेल आणि भुजबळ यांना पाठवल्याशिवाय ते जाणार नाहीत, अशी शंका व्यक्त करतानाच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही, असं ते म्हणाले. यांना मतदारांशी काहीही देणंघेणं नाही, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिले. उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार का, या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. मी लवकरच मेळावा घेणार आहे, त्यात सर्व स्पष्ट करेल, असंही त्यांनी सांगितले.

मुंबई - देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू, खातेवाटप, अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात चर्चा

अजित पवार यांच्या बंडानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला नवनियुक्त मंत्रीही उपस्थित आहेत. खातेवाटप आणि अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात यात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच ५ तारखेला मेळावा घेण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे.

पक्ष आणि चिन्ह सगळं आमचंच; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे सगळं आमचंच आहे. ते आमच्याकडेच राहणार आहे, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. गुरुपौर्णिमेला मी स्वतः शरद पवार यांना फोन करणार असून, त्यांचे आशीर्वाद मागणार आहे. येत्या दोन-चार दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

उलथापालथ करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवणार; शरद पवारांनी ठणकावून सांगितलं

देशातील अनेक राज्यांमध्ये सरकार पाडायचं काम केलं. जातीय सरकार पुढे आणलं. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाला धक्का देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्रात जी उलथापालथ होते, त्यातच आपले काही सहकारी बळी पडले आहेत. उलथापालथ करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, या शक्ती आणि प्रवृत्तीला धक्का देऊन महाराष्ट्र फिरू, असं शरद पवारांनी आज कराडमध्ये ठणकावून सांगितलं.

चुकीच्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत - शरद पवार

लोकशाहीच्या अधिकारांचे जतन केले पाहिजे - शरद पवार

शरद पवार यांनी साताऱ्यातील कराडमध्ये प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आता आवाज माझ्या एकट्याचाच अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं. लोकशाहीच्या अधिकारांचे जतन केले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर शरद पवारांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

शरद पवारांचं करामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन; कार्यकर्त्यांचा गराडा

शरद पवार कराडमध्ये दाखल झाले आहेत. लवकरच ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. या प्रसंगी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. पवार कराडमध्ये पोहचताच कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातलाय.

विधानसभा अध्यक्ष विधानभवनात दाखल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानभवनात दाखल झाले आहेत. विधानसभा सदस्या जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका सादर केली आहे. ते पाहून त्यावर अभ्यास करुन मी योग्य तो निर्णय घेणार, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

रुपाली चाकणकर अजित पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर चाकणकर यांनी आजित पवारांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या समर्थक आणि जयंत पाटील यांच्या विश्वासू म्हणून चाकणकर यांची ओळख आहे.

अजित पवार यांच्याशी त्यांनी काल १५ ते २० मिन चर्चा केली. मात्र अद्याप त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. याआधी जेव्हा अजित पवार यांनी बंड केलं होतं तेव्हा चाकणकर या पहिल्यापासून शरद पवार यांच्या सोबत होत्या. त्यावेळी पवार यांच्या सोलापूरमध्ये झालेल्या सभेत देखील चाकणकर उपस्थितीत होत्या.

राजकीय घडामोडींचे LIVE Update येथे पाहा

पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोन कॅमेरा; राजकीय वर्तुळात खळबळ !

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ड्रोन कॅमेरा उडाल्याचं पहायला मिळालं आहे. नो फ्लाईंग झोन असतानाही ड्रोन कॅमेरा उडवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एस पी जी ने दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली आहे. पहाटे साडेपाचच्या दरम्यान ड्रोन उडवल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून कसून शोध सुरू असून ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

भाजप पक्ष फोडणार याचा अंदाज होता - रोहित पवार

"भाजप ज्यापद्धतीने शिवसेना फोडली तसाच प्रयत्न राष्ट्रवादीच्या बाबतीत होईल, असा अंदाज होतो," उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार कराडसाठी रवाना; राजकीय घडामोडींना वेग

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. आपल्या निवासस्थानाहून ते कराडला रवाना झाले आहेत.

अजित पवार यांच्यासह ९ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत भाजप आणि शिवसेना सरकारला पाठिंबा दिला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना घेऊन त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, राष्ट्रवादीने अजित पवार यांच्यासह ९ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com