मान्सूनने दोन आठवड्यांनंतर पुन्हा वेग पकडला
मुंबई, पुणे आणि अलिबागसह अनेक भागांत पावसाची सुरुवात
२६ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापणार
रखडलेल्या खरीप पेरण्यांना मान्सूनच्या पुनरागमनामुळे दिलासा
Maharashtra Monsoon Rain Update News राज्यात दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून आज त्याने अलिबागसह मुंबई, पुण्यापर्यंत मजल मारली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या २६ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. आज सकाळपासूनच मुंबई पुण्यासह अनके जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली होती. त्याचबरोबर खरीप हंगामाच्या पेरण्या देखील रखडल्या होत्या. मात्र मान्सूनच्या पुनरागमनाने नागरिकांसोबतच शेतकरी राजाला दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ८ जून रोजी मान्सूनने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर वातावरणातील अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे मान्सूनची पुढील वाटचाल तब्बल दोन आठवडे थांबली होती. या काळात मान्सूनची सीमा हरणई, सोलापूर, हैदराबाद, भद्राचलम, कोरापुट, फुलबनी, रांची, जमुई आणि मुझफ्फरपूर या भागांमध्ये स्थिर होती.
सोमवारी मात्र परिस्थितीत बदल झाला आणि मान्सूनने आगेकूच करत अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बालांगीर, सुंदरगढ, छत्रा, गया आणि मुझफ्फरनगरपर्यंत प्रगती केली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत मान्सून राज्यातील आणखी काही भाग व्यापण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतही सोमवारी सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार,२६ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलका पाऊस सुरू झाला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा चटका अद्याप कायम आहे. शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुरेशा पावसाची वाट पाहावी, असे आवाहन वेधशाळेकडून करण्यात आले आहे. किमान ६५ मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे अधिक सुरक्षित ठरेल, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.