पुणे- सोलापूर महामार्गावर अचानक डुक्कर आडवे गेल्याने पोलीस उपनिरीक्षकाचे (psi) चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
महेश अंबादास गळगटे (वय- 36, रा. राममंदिर लेन, आष्टी, जि. बीड)असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.त्यांच्यावर लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील सहजपुर गावच्या उमेश म्हेत्रे या तरुणाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नवी दिल्ली मधील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी.मोदी व गिरीमा जैन याच्याकडे उमेदवारी अर्ज आणि 15000 रुपयांचे डिपॉझिट जमा करून अर्ज दाखल केला. त्यांच्या या कृतीने सर्वजण आश्चर्यचकित झाले असून थेट भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिळाली होती, त्यावरून मेहकर पोलिसांनी सापळा रचून एका आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 65 लाखाचा गुटखा आढळून आला आहे, पोलिसांनी गुटख्यासह वाहन असा एकूण 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे, या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
भंडारा येथील मणप्पुरम गोल्ड लोन बँकेच्या मॅनेजरनं फसवणूक केल्याचा आरोप करीत भंडाऱ्यातील अमित जोशी यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातचं पॉयझन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळं भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनं पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिसांनी त्याला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केलं. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
वाशिम जिल्ह्यात १५ ते १८ ऑगस्ट कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरांचे मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. यात एकूण ३५ जनावरे आणि ३ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. घरांच्या पडझडीत वाशिम तालुक्यात ९७, रिसोड तालुक्यात १८४, मालेगाव तालुक्यात ७२ आणि मंगरूळपिर तालुक्यात ५१ अशा एकूण ४०४ घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या धक्क्यातून सावरण्यासाठी शासनाकडून कधी मदत मिळेल. याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागले आहे.
बेपत्ता होमगार्ड महिलेचा खून; मैत्रिणीच्या कबुली जबाबानंतर बीडमध्ये खळबळ. बीड मधील गुंडाराज कधी थांबणार? चक्क होमगार्ड महिलेचीच हत्या मृतदेह बॉक्समध्ये बांधून फेकून दिला. बीड शहरात धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता तक्रारीनंतर एका होमगार्ड महिलेचा मृतदेह गुरुवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी आढळला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.
मृत महिलेचे नाव आयोध्या राहुल व्हरकटे (वय 27, रा. बीड) असे आहे. आयोध्या ही होमगार्ड म्हणून कार्यरत होती. ती काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
बंदाेबस्त आणि वाहतुकीचे नियाेजन करण्यास पुणे पोलिसांना मदत होणार आहे. पुण्यातील गणेश उत्सव दरम्यान माेठया प्रमाणात भाविक जमत असल्याने शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतुकीचे नियाेजन करणे, पर्यायी मार्ग नागरिकांना उपलब्ध करुन देणे व पाेलीस बंदाेबस्ताचे अचूक नियाेजन करणे यासाठी ए आय ची मदत घेणार आहे. पारंपारिक बंदाेबस्तसाेबत स्मार्ट ए आय कॅमेरे आणि विशेष साॅफ्टवेअरचा वापर करुन शहरात विविध ठिकाणी गणेशाेत्सव दरम्यान भाविकांची अचूक माहिती गाेळा केली जाणार आहे.
वाहतूक नियाेजन, सुरक्षा व बंदाेबस्त नेमणूक यास मदत हाेणार आहे. यंदा पुणे पोलिसांनी देहू व आळंदी येथून आषाढी दरम्यान निघणाऱ्या पालखीचे नियोजन करताना या तंत्रज्ञानाचा वापर केला होता.
अगदी रहदारीचा भाग, भर चौकात "मानवी सांगाडा" आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् धावपळ उडाली! हा सगळा प्रकार गुरुवारी संध्याकाळी पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या या चौकात मध्यभागी मानवी हाडाचा सांगाडा पडला असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. हाडांचा सांगाडा डोके, धड आणि कमरेपर्यंत होता. रस्त्याच्या मध्यभागी असलेला सांगाडा मोठ्या रहदारी मुळे लक्षात न आल्यामुळे काही चार चाकी वाहने त्याच्यावरून गेली. काही नागरिकांनी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच पोलिसांनी जागेवर जाऊन तो मानवी सांगाडा ताब्यात घेतला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. पोलिसांनी हा सांगाडा व्यवस्थित तपासला असता तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणि तारेचा वापर करून बनवलेला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
पावसाची रिमझिम आणि सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडलेल्या चाकरमान्यांसाठी गुरुवारचा प्रवास खडतर ठरला. पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना तास न् तास अडकून पडावे लागले. या कोंडीमुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळेदेखील वाहतूक विस्कळित झाली. गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता तसेच पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहराच्या मध्य भागातही पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली होती. रात्री ९ वाजेपर्यंत रस्त्यावरची कोंडी कायम राहिल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
नाशिकच्या मुंबईनाका परिसरात मुख्य रस्त्यावरील एका नव्या व्यावसायिक संकुलात 'आरंभ स्पा' नावाने थाटण्यात आलेल्या मसाज पार्लरमध्ये काही युवतींकडून देहविक्रय करून घेतला जात होता. पोलिस आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून गुरुवारी रात्री या स्पावर छापा टाकण्यात आला. तेथून पाच पीडित युवतींची सुटका करत त्यांना संशयित आरोपी खुशबू सुराणा हिला ताब्यात घेत अटक केली आहे. दिल्ली, कानपूर, बिहार, मिझोराम या राज्यांमधून युवतींना याठिकाणी आणण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. तसेच यापूर्वीही खुशबू सुराणा महिलेविरुद्ध अशाप्रकारे अनैतिक देहविक्रय व्यवसाय चालविणे, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीये. आता पुन्हा मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत तांड्यांना स्वातंत्र्य ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून 36 तांडे पात्र ठरले आहेत.त्यातील 35 प्रस्ताव हे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आले असून त्यातील 11 प्रस्ताव हे विभागीय स्तरावरून ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी शासन स्तरावर सादर करण्यात आले आहे तर 24 प्रस्तावित त्रुटीत असल्याने ते विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे परत पाठविण्यात आले आहे.
कामशेत च्या जवळील नायगाव येथे पहाटे तीनच्या सुमारास आग लागून नवीन शॉपिंग सेंटर मधील तीन दुकाने जळून खाक झाली आहे. टोनी द धाबा समोर असलेल्या नवीन शॉपिंग सेंटर मध्ये श्री गजानन इलेक्ट्रिकल, एकवीरा मटन खानावळ, आणि त्याच्या शेजारील आणखी एक अशी तीन दुकाने या आगीत जळून खाक झालेली आहे. या आगीत कोणतीही जीवित झाली नाही, मात्र दुकान मालकाचे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे. एका नागरिकाला दुकानातून धूर येत असून शटर लाल झाल्याचे दिसले, त्याने त्वरित दुकान मालकाला फोन करून या संबंधित घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वडगाव मावळ व तळेगाव एमआयडीसी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी एका तासात ही आग आटोक्यात आणली....
भीमा आणि निरा खोर्यात सुरु असलेल्या पावसामुळे पंढरपुरातील चंद्रभागेला पूर आला आहे. चंद्रभागेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेल्याने रात्री पंढरपूर ते विजय पूर महामार्ग बंद झाला आहे.
धाराशिव मधील नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांतुन होणाऱ्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त झाली असुन नियमानुसार सात दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते तरीही आता 18 महिने उलटूनही यामध्ये काहीच होत नाही.यासाठी धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी नगरविकासचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज यांची भेट घेऊन ही कामे लवकर सुरु करावीत अशी मागणी केलीय
वाशिम जिल्ह्यात गत चार दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यात कमालिची वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण 167 लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल 105 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामध्ये पाटबंधारे विभागाचे 37 तर मृद व जलसंधारण विभागाच्या 68 प्रकल्पांचा समावेश आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अनेक ठिकाणी शेती सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.
मुसळधार पाऊस तसेच अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्याचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला असून पूस प्रकल्पासह गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, सायखेडा प्रकल्प 100% भरले आहेत लघु प्रकल्पही भरल्याने वर्षभराचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे. आशात गोकी प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेताहेत.
गणेशोत्सव आता आवघ्या चार पाच दिवसांवर येऊन ठेपला असून येता दोनच दिवसात मुंबईकर चाकरमान्यांचा गणेशोत्सवासाठीचा कोकणचा प्रवास सुरु होईल. गेल्या पंधरा वर्षाच्या मानाने या वर्षी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेत फरक पडला आहे. पळस्पे ते कशेडी दरम्यान रायगड जिल्हा हद्दीत येणाऱ्या महामार्गाचे काम 80 टक्के पूर्ण झाले असलेतरी नागोठणे, खांब, कोलाड आणि लोणेरे परिसरात महामार्गाचे काम आजही अपूर्ण आहे. या भागात महामार्गावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे या वर्षी देखील गणेश भक्त चाकरमान्यांना खड्डयांतुन प्रवास करण्याची वेळ येणार आहे.
राज्यात गुन्हेगारांवर वचक निर्माणकरण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढल्या जातंय. अकोल्यातल्या मूर्तिजापुरात देखील गाव गुंडांची धिंड काढण्यात आलीय.. या अट्टल गुन्हेगारांनी अक्षरशः कान पकडून नागरिकांना माफी मागितलीये. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या या 5 गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हा 'रोड शो' होता. सनि दुबे, वैभव कोकाटे, यश केसले, आकाश उईके आणि आदित्य कोकाटे असे या गाव गुंडाची नावे आहे. या गुन्हेगारांना अकोला पोलिसांनी चांगला धडा शिकवला. आणि यापुढे 'जे कायद्यात राहतील ते फायद्यात राहतील' असा इशारा पोलिसांनी दिलाय.
अकोल्यात रुग्णवाहिका संघटना आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद पेटलाय. कारण ठरलंय वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला दिलेला दंड. सार्वजनिक ठिकाणी रुग्णवाहिका उभी केल्याच्या कारणावरून 500 रुपये दंड चालकाला दिलाय. तर याच विरोधात 'आक्रमण रुग्णवाहिका संघटना' ही आक्रमक झालीय. रुग्णवाहिकाला चालन देणाऱ्या वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्यावर कारवाईची मागणी केलीय. तसेच या संदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रुग्णवाहिका संघटनेने निवेदनाद्वारे दिलाय
राज्यभरात पारंपरिक बैलपोळा साजरा होत असताना, त्याच्या पूर्वसंध्येला आज अमरावती जिल्ह्यात खांद शेखणीचा विधी मोठ्या उत्साहात पार पडला. वर्षभर शेतकरी शेतीची मशागत करण्यासाठी बैलांच्या खांद्यावर वखरणी, डवरणी व जुवाचा भार पडत असतो. त्या मेहनती खांद्यांना आज लोणी व हळद लावून शेक दिला जातो, ज्याला खांद शेखणी असे म्हटले जाते.
या विधीमुळे बैलांच्या खांद्यांना आराम मिळतो तसेच त्यांच्या कष्टाचे स्मरण करून त्यांचा सन्मान केला जातो. ग्रामीण भागात सर्वत्र हा सोहळा पारंपरिक रितीने साजरा झाला.याचसोबत उद्या बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळीच्या जेवणाचे आमंत्रण देण्याची प्रथा आहे. त्यामुळे आजच्या खांद शेखणीनंतर शेतकऱ्यांच्या घराघरांत बैलपोळ्याच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.