Local body Election Raigad Political News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या घोषणेआधीच महाराष्ट्रातील रायगडमध्ये युतीचा आगळा वेगळा प्रयोग पाहायला मिळाला आहे. महायुतीमधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला रोखण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. ठाकरे-पवारांच्या युतीमुळे कर्जतमधील शिंदेंचा आमदार एकाकी पडल्याचे चित्र तयार झालेय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जातो, असाच निर्णय कर्जतमध्ये घेण्यात आला याची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली.
रायगडमधील कर्जतमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अन् शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील राजकीय वैर कर्जतमध्ये प्रत्येकाला माहितेय. थोरवेंना रोखण्यासाठी घारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांची नुकतीच गुप्त बैठक झाली. त्यावेळी स्थानिक पदाधिकारी अन् कार्यकर्तेही उपस्थित होते. या बैठकीत थोरवेंच्या विरोधात सावंत अन् घारे यांनी फिल्डिंग लावली. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंना कोंडीत पडकण्यासाठी ठाकरे अन् पवारांचे कार्यकर्ते एकत्र आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जतमध्ये भाजप स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे कर्जतची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि ठाकरे सेनेचे नितीन सावंत या दोन्ही नेत्याचे कर्जतमध्ये स्थानिक पातळीवर मोठं वजन आहे. घारे यांनी विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावले होते, पण त्यांना अपयश आले. आता थोरवेंना रोखण्यासाठी सावंत-घरे यांनी रणनिती आखली आहे. दोघांनी गुप्त बैठक घेत कार्यकर्त्यांना काम कऱण्याच्या सूचना दिल्या आहे. स्थानिक पातळीवरील या युतीमुळे महायुतीला मोठा धक्का बसल्याची चर्चा रायगडमध्ये सुरू आहे. राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधी कर्जतमधील राजकारण तापलेय. आता कर्जतमध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रायगडच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्यामध्ये पहिल्यापासूनच वाद आहे. तटकरे अन् गोगावले यांच्या राजकीय वादाचा अंक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय. रायगडमध्ये दोन्ही पक्षाकडून स्वबळाची भाषा करण्यात येत आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यात टोकाचे मतभेद आहेत. शिंदेंच्या महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी घारे यांनी विरोधात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. आता निवडणुकीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.