
एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. येत्या गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. यामुळे चाकरमानी आणि प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
भाडेवाढीचे कारण काय?
यंदा गणेशत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून तब्बल ५ हजार जादा एसटी बसेस कोकणात सोडण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. शासनाच्या विविध सवलती ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी अमृतयोजना या प्रवासात लागू राहणार आहेत. मात्र, बहुतांश प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करतात, त्यामुळे परतीच्या प्रवासात अनेक बसेस कोकणातून रिकाम्या परत आणाव्या लागतात. यामुळे इंधन खर्च, चालक-वाहकांचे वेतन यांचा प्रचंड आर्थिक भार एसटीवर पडतो.
गणेशोत्सवासाठी राज्यभरातून बसेस एकत्र करून कोकणात पाठवल्या जातात. ज्यामुळे इतर भागांत स्थानिक बस सेवांवर परिणाम होतो. स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता होते. यामुळे आणखी तोटा वाढतो. हा तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी एसटीने तात्पुरती ३०% भाडेवाढ जाहीर केली होती. परंतु, मुंबईकरांचा विरोध आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या सूचनेनंतर एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली.
१६ कोटी रुपयांचा तोट्याचा अंदाज
मागील वर्षी गणपतीत ४,३३० बसेस कोकणात जाण्यासाठी आणि केवळ १,१०४ बसेस परतीसाठी प्रवाशांनी आरक्षित केल्या होत्या. परिणामी रिकाम्या बसेस परत आणण्याचा खर्च, अन्य भागांतून कोकणात बस पाठवण्याचा खर्च यामुळे ११.६८ कोटींचा तोटा झाला. यंदा ५,००० बस पाठवण्याचे नियोजन असल्याने तोटा १३ ते १६ कोटींवर जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.