दुष्काळग्रस्तांना 'मायक्रो फायनान्स'चा विळखा, कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या बायकांचे काढले फोटो

Microfinance Loan Recovery Harassment: एकीकडे आस्मानी संकाटानं शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता वसुलीसाठी शेतकऱ्याच्या दारात आलेल्या एजंटनं शेतकऱ्याच्या बायकोचा फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.. नेमकं प्रकरण काय? वसुलीसाठी एजंट शेतकऱ्याला कसा त्रास देतात? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
MAHARASHTRA FARMERS CRISIS
MAHARASHTRA FARMERS CRISISsaam tv
Published On: 

राज्यात भीषण दुष्काळाचं संकट असताना बळीराजाकडून कर्जवसुलीच्या बेकायदा प्रकारांनी कळस गाठलाय... सरकारकडून कर्जवसुली थांबवण्याच्या घोषणा वारंवार होत असल्या, तरी प्रत्यक्षात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांची अरेरावी थांबण्याचं नाव घेत नाहीये.... अकोल्यात वसुलीसाठी आलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंटनं तर वसुलीसाठी दबाव टाकत थेट शेतकऱ्याच्या बायकोचे फोटोच काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेतकरी आणि वसुलीसाठी आलेल्या या एजंटमधील हे संभाषण ऐका....

ऐकलतं... वसुलीसाठी एजंट थेट शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहचला..मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनं आणि त्याच्या बायकोनं केलेल्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. अशा या सुल्तानी कर्जफेडीच्या तगाद्यामुळे अनेक शेतकरी महिलांवर कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी रेशनिंगवर मिळालेले धान्य बाजारात विकण्याची वेळ आलीय.

लातूरच्या मनकाबाई लोंढे यांची कहाणी तर आणखी भयानक आहे... मुलाच्या उपचारासाठी घेतलेले 50 हजारांचं कर्ज फेडता आले नाही आणि अखेर मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर हे कर्ज फेडण्यासाठीच सुनेने दुसऱ्या मायक्रो फायनान्सकडून 2 लाख 20 हजारांचे कर्ज घेतलं. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे तेही फेडणे शक्य न झाल्याने सुनेनेही गळफास घेऊन जीवन संपवलयं. आता घरात कमावणारा कोणी नाही आणि हाताला मजुरीही नाही, अशा बिकट परिस्थितीत मायक्रो फायनान्सचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न या हतबल आईसमोर उभा राहिलाय.

दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील जेवळी येथील तरुण शेतकरी रोहित कारभारी याचंही जगणं कर्जामुळे कठीण झालयं...वडीलांना अर्धांगवायू झाल्यामुळे शिक्षणाला रामराम ठोकत कुटुंबाची मदार रोहितनं स्वतःच्या खांद्यावर घेतली...मात्र स्वतःच्या दोन एकर शेतीसोबतच बटाईनं घेतलेल्या 12 एकर शेतीतून हाती काहीच न आल्यानं कर्जाचा भार आणखी वाढलाय...

दुष्काळात राज्यातील शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा भार कसा वाढलाय..पाहूयात..

रिझर्व्ह बँकेनं 22 टक्के व्याजापर्यंत मायक्रो फायनान्स लोन देण्याची परवानगी दिली आहे..

मात्र प्रत्यक्षात मायक्रो फायनान्स कंपन्या तब्बल 26 ते 28 टक्के व्याज दराने शेतकऱ्यांना कर्ज देतात

कंपन्यांच्या वसुलीबाबतच्या तक्रारी किंवा व्याजदराबाबत तक्रारीसाठी जिल्हास्तरावर कोणतीही यंत्रणा नाही

दरम्यान सरकारनं एजंटची दंडेलशाही लगेच थांबवावी अन्यथा वसुलीदारांना कपडे फाटेपर्यंत चोप दिला जाईल, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिलाय...तर दुसरीकडे कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनीही एजंटच्या दादागिरीवर कारवाईचा पवित्रा घेतलाय...

एका बाजूला शासनाकडून कर्जवसुलीच्या स्थगितीचे आदेश दिले जात असले तरी प्रत्याक्षात मायक्रो फायनान्स आणि खाजगी वित्तीय कंपन्यांकडून मोठी लूट सुरू आहे. त्यामुळे या कंपन्यांवर कठोर कारवाई गरज असून सरकारनंही तातडीनं दुष्काळी मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरी मोठ्या संकटात सापण्याची भीती आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com