दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा निर्णय
आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश
दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी लागू असलेल्या १२ सवलती सुरू राहणार
गरजेनुसार टँकर वाढवणार आणि जीपीएस ट्रॅकिंगद्वारे देखरेख करणार
महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना राज्य सरकारने शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यातील आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त आणखी निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यात सुरुवातीला २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते. आता त्यामध्ये आणखी ४० तालुक्यांची भर पडल्याने राज्यातील एकूण ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. साधारणपणे नोव्हेंबरच्या अखेरीस दुष्काळ जाहीर केला जातो. मात्र, परिस्थिती लक्षात घेऊन यंदा ऑक्टोबरमध्येच दुष्काळाबाबत जीआर काढण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळग्रस्त तालुक्यांना लागू असलेल्या १२ सवलती सुरू राहणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होत असल्याचेही सांगण्यात आले.
मराठवाड्यात पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा खाली गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे. राज्यात आतापर्यंत १६ हजार अनधिकृत पाणी कनेक्शन तोडण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शैक्षणिक शुल्क माफीच्या शासन निर्णयातील अटी-शर्ती हटवण्यात आल्या आहेत. वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांवर तगादा लावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच कर्जवसुली करताना बँकांनी अतिउत्साह दाखवू नये, असे सांगण्यात आले आहे. खासगी बँका आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांशीही यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड करावी. सरकार हा चारा खरेदी करणार असल्याचेही सांगण्यात आले.दरम्यान हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.