महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. राजकीय जाणकारांच्या मते, राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असून जागा वाटापासंदर्भात युती आणि आघाडीमध्ये चर्चा सत्र सुरू झाल्या आहेत.
महायुतीमध्ये मात्र बैठका होण्याआधी युतीमधील नेते एकमेकांवर जळजळीत टीका करतांना दिसत आहेत. शिंदे गट शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी अजित पवारांवर टीका केल्याने महायुतीत तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आज शनिवारी जागा वाटपासंदर्भात महायुतीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीची काय चर्चा झाली?, याची माहिती उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिलीय.
निवडणुकीसाठी २८८ जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत चर्चा या बैठकीत झाली. दरम्यान याविषयावर पुन्हा एकदा चर्चा होणार असून दुसऱ्यांदा बैठक घेतली जाणार असल्याचं अजित पवार म्हणालेत."आम्ही जागावाटपाबाबत पहिल्या फेरीत चर्चा केली. आम्ही दुसऱ्यांदा बसू आणि २८८ जागांपैकी कोणाला कोणती जागा मिळेल हे ठरवू, आम्ही त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ." असं ते म्हणालेत. इलेक्टिव्ह मेरिट हाच जागा वाटपाचा निष्कर्ष असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
माध्यम प्रतिनिधींनी अजित पवार यांना शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविषयी प्रश्न केला, मात्र अजित पवारांनी त्यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला."कोणी काही बोलले असेल, तर मला त्यावर भाष्य करायचे नाही. मी जन सन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवले होते की, मी कोणावरही भाष्य करणार नाही. माझ्यावर कोणी टीका केली तरी मला फरक पडत नाही. माझा विश्वास कामात आहे" असं अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे सावंत यांच्या टीकेला उत्तर दिलंय.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी युतीबाबत नाराजी व्यक्त केली होती."आम्ही मंत्रिमंडळात एकमेकांच्या शेजारी बसतो. मात्र बैठकीच्या सभागृहातून बाहेर आल्यावर उलट्या झाल्यासारखे वाटतं," असं सावंत म्हणाले. याआधी अजित पवार यांनी मालवणमध्ये २६ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या जागेला भेट दिली. पवार म्हणाले, "जे घडले त्यामुळे सर्वांनाच दु:ख झालंय.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या वारशाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्यात. स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसचे दोषींवर कारवाई केली जाईल. ते कुठेही पळून गेले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं अजित पवार म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.