
वनताराचे सीईओ आणि नांदणी मठाधिपती यांच्यात बैठक
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली माहिती
महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरात येणार असल्याची वर्तवली शक्यता
रणजित माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात मागील ४० वर्षांपासून महादेवी (माधुरी) ही हत्तीण वास्तव्याला होती. जैन समाजाच्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानाच्या मठात ही हत्तीण राहत होती. अंबानी यांच्या ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्राने या हत्तीणीवर दावा केला. ही लढाई कोर्टात गेली. कोर्टाने वनताराच्या बाजूने निकाल दिल्याने महादेवीला वनतारामध्ये पाठवण्यात आले. यामुळे कोल्हापुरामध्ये वातावरण तापले. अशातच महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याने वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणी आणि त्यांची टीम कोल्हापुरात दाखल झाली. वनताराच्या व्यवस्थापक मंडळ नांदणी मठाचे मठाधिपती यांची भेट घेतली. मठाचे अधिपती यांच्याशी चर्चा करुन तडजोडीचा मार्ग शोधण्यासाठी वनताराचे व्यवस्थापक मंडळ कोल्हापुरात दाखल झाले.
कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या बैठकीबाबतची माहिती दिली. 'वनताराचे सीईओ आणि नांदणी मठाचे स्वामी यांच्यामध्ये दीड तास बैठक झाली. महादेवी हत्तीणीला परत करण्याची मागणी मठाधिपती यांनी सीईओकडे केली आहे. महादेवीला घेऊन जाण्यामध्ये वनताराचा संबंध नाही, हत्ती परत करायचे असल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असे वनताराच्या व्यवस्थापक मंडळाने म्हटले. जनभावना लक्षात घेता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पुन्हा महादेवी हत्तीण नांदणीमध्ये येण्याची शक्यता आहे. वनताराच्या सीईओंनी सकारात्मक संकेत दिले आहे. नांदणी परिसरामध्ये वनताराचे एक युनिट उभी करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे', असे कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी म्हटले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव वनताराचे मंडळ नांदणी मठामध्ये गेले नाही. मंडळातील सदस्य आणि नांदणी मठाचे अधिपती यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट झाली. या भेटीनंतर मठाधिपती तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिला. ते बैठकीतून का बाहेर पडले याचे कारण सध्या अस्पष्ट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.