
नगर: भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. पिचड यांचं नाशिकमध्ये साडेसहा वाजता निधन झालं. अहमदनगर जिल्ह्यातील राजूरमध्ये त्यांचं राहते घर होते. त्यांना ब्रेनस्ट्रोक आल्याने नाशिकमधील नाइन पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम मूळगावी राजूर येथे उद्या दुपारी चार वाजता होणार आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मधुकर पिचड यांनी राजकीय क्षेत्रात मोठं यश संपादन केलं होतं.
मधुकर पिचड यांचं अकोले कॉलेज आणि पक्ष कार्यालयात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी ठेवले जाईल. त्यांचं पार्थिव शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळगावी देवठाण येथे पाठवले जाणार आहे. मधुकरराव पिचड महाविद्यालयात त्यांचं पार्थिवाचं नागरिकांना अंतदर्शनासाठी पार्थिव ठेवले जाईल. दुपारनंतर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होईल'.
मधुकर पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांचं शालेय शिक्षण त्यांच्या मूळगावी झालं. तर माध्यमिक शिक्षण संगमनेर येथे झाले. त्यांनी पदवीच्या शिक्षणासाठी पुण्यातील फर्क्युसन महाविद्यालयात प्रवेश केला. तेथे त्यांनी एलएलबीचे दोन वर्षे केले. येथेच त्यांचा राष्ट्र सेवा दलाशी संपर्क आला. त्यांनी महाविद्यालयीन निवडणुकांत सहभाग नोंदवला होता.
महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान ते थोर विचारवंत आणि स्वातंत्र्य सैनिक प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या संपर्कात आले. त्यांना पुढे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करावे म्हणून प्रोत्साहन मिळाले. त्यांच्याच प्रेरणेने नोकरीच्या फंदात न पडता सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. महाविद्यालयात असतानाच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आदिवासी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला. त्यांनी पहिला लढा १९६१ साली दिला.
पुढे त्यांनी सहकारी तत्त्वावर पहिली दूध संस्था राजूर येथे काढली. पहिल्या दिवशी २५ ते ३० लिटर दूध गोळा झाले. पुढे हाच धंदा तालुक्याचा प्रमुख व्यवसाय बनला. आज तालुक्यात २ लाख लिटर दूधाचे संकलन होत आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली. आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली. याच संस्थेच्या अनेक आश्रमशाळा, माध्यमिक शाळा, वसतीगृहे आहेत. अकोले तालुक्यात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसची पाळमुळे रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेस हा व्यापारी धनिकांचा पक्ष आहे, ही प्रतिमा नाहीशी केली. पुढे सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच्या प्रवाहात आणले.
जिल्हा परिषद सदस्य : १९७२ ला निवडून आले.
सभापती : १९७२ ते १९८० पर्यंत अकोले पंचायत समितीचे सभापती. सभापती असतांना १९७२ च्या दुष्काळात अहोरात्र काम केले. मेडिकल कॅम्पचे आयोजन, गाव तेथे रस्ता, तलाव या योजना राबविल्या.
विधानसभा सदस्य : १९८० ला विधानसभेवर निवडून गेले. आमदार झाले.
समितीवर निवड : १९८० ते १९८५ विधानसभा अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख म्हणून काम केले.
राज्यमंत्री : जून १९८५ ते १९८६ राज्यमंत्री
२७ जून १९८८ ते १२ मार्च १९९० कृषी, रोहयो, आदिवासी विकास, दुग्ध विकास, पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री
कॅबिनेट मंत्री : २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९६ आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री याच दरम्यान मार्च १९९३ ते सप्टेंबर १९९४ आदिवासी विकास सहपशुसंवर्धन व दुग्ध, मत्स्य विकास मंत्री
सप्टेंबर १९९४ ते नोव्हेंबर १९९४ आदिवासी विकास,परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री
राजीनामा : २४ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी हत्याकांडाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नागपूर अधिवेशनात मंत्रीपदाचा राजीनामा
संस्थापक अध्यक्ष : १९९३ मध्ये अगस्ति सह. साखर कारखान्याची स्थापना केली.
विधानसभा विरोधी पक्ष नेते : २५ मार्च १९९५ ते २५ जुलै १९९९ विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी यशस्वी पेलली. कॅबिनेट मंत्री : १९ ऑगस्ट १९९९ ते ऑगस्ट २००४ आदिवासी विकास, विशेष सहाय्य मंत्री
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेवर ७ ऑक्टोबर २००१ रोजी निवड
प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड कॅबिनेट मंत्री : ११ जून २०१३ रोजी आदिवासी विकास मंत्री म्हणून निवड
मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव यांनी २०१९ साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी २०१९ साली किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला होता. यंदा शरद पवार गटाकडून अकोले विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पिचड कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.