मुंबई : वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला सिलिंडरच्या दरात (LPG Cylinder Prices) मोठी कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार 19 किलोग्रॅम व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल 136 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. (LPG Gas Cylinder Prices cut)
गेल्या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दोन वेळा वाढ करण्यात आली होती. 7 मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 तर 19 मे रोजी 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला घरगुती सिलिंडरचे दर कमी होतील अशी अपेक्षा नागरिक बाळगून होते. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कुठलाही बदल करण्यात आला नाही.
दुसरीकडे दिल्लीत कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सर्वाधिक कपात करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरआज 136 रुपयांनी स्वस्त झाला आहे, दिल्लीपाठोपाठ कोलकत्त्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 133 रुपयांनी कमी झाल्या आहेत. याशिवाय, मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत तब्बल 135.50 किंमत रुपयांनी कमी झाली आहे.
आजपासून या दराने सिलिंडर उपलब्ध होणार
आज म्हणजेच 1 जून रोजी 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरवर थेट 135 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. आता 19 किलोचा सिलिंडर मुंबईत 2306 ऐवजी 2171.50 रुपयांना, दिल्लीत 2354 ऐवजी 2219 रुपयांना, कोलकात्यात 2454 ऐवजी 2322 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 2507 ऐवजी 2373 रुपयांना विकला जाणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत होती. गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडर तब्बल 250 रुपयांनी महाग झाला होता. याचा मोठा फटका हा हॉटेल व्यावसायिकांना बसत होता. मात्र आज व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 136 रुपयांची कपात करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.