प्रसाद जगताप
लोकसभेच्या मावळ मतदारसंघावरून महायुतीत सध्या कलगीतुरा पाहायला मिळत आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळं या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसभेच्या एका जागेवरून महायुतीतील संघर्ष चव्हाट्यावर येणार की जागावाटपात मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागणार? महायुतीचं इंजिन ट्रॅकवरून घसरणार? अशा असंख्य प्रश्नांची वावटळ मावळ लोकसभा मतदारसंघातील धुरळ्यामुळं राजकीय वर्तुळात उडाली आहे. या मतदारसंघावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी दावा ठोकला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उद्धव ठाकरे गटानेही ही जागा जिंकण्याचा दावा केला आहे. आता नेमकी ही जागा कुणाच्या वाट्याला जाते? कोण गुलाल उधळतो? आणि काय आहे मावळ लोकसभा मतदार संघाचा इतिहास? जाणून घेऊयात. मावळ लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून पहिल्यांदाच पवार घराण्याच्या वाट्याला पार्थ पवारांच्या रुपाने पराभव पत्कारावा लागला होता. अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार पहिल्यांदा याच मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांचा श्रीरंग बारणे यांनी पराभव केला.
या लोकसभा निवडणुकीतच अजित पवारांनी विजय शिवतारेंना खुल आव्हान देऊन भर सभेत पाडण्याची भाषा केली होती. याच निवडणुकीवरुन पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. अजित पवार गटाने या जागेवर दावा ठोकला आहे. तर सध्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपनेही आपलाच उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी या जागेवर दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही ही जागा मिळावी यासाठी कंबर कसली आहे. सगळ्याच पक्षांच्या या दाव्यांमुळे मावळ मतदारसंघ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे. आता या जागेचा तिढा कसा सुटणार? शिंदे फडणवीस आणि पवार आपल्या कार्यकर्त्यांची कशी समजूत काढणार? महायुतीचा नेमका कोणता उमेदवार 'फिक्स' होणार? श्रीरंग बारणेच पुन्हा निवडणूक लढवणार? की त्यांना भाजपच्या तिकीटावर लढावे लागेल, अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं अगदी काही दिवसात मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.