
काशिनाथ साळवे यांचे काल रात्री निधन झाले. त्यांनी कलाविश्वात खूप मोलाचे काम केले आहे. त्यांच्या कलांनी अक्षरक्ष अनेकांचे डोळे पाणवले आहेत.
एक कायम हसतमुख आणि प्रचंड उत्साहाने सळसळणारे व्यक्तिमत्व काल रात्री आपल्याला सोडून गेले. गेली काही वर्षे ते खूपच आजारी होते... आजारी साळवे सर आठवताना मनाला प्रचंड वेदना होतात. पण कायमच लक्षात राहतील ते आयुष्यभर हसतमुख असणारे आणि जेजेतच नव्हे तर महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्र बाहेरही कायमच "शाब्बास ... बहोत अच्छे ... क्या बात ... असे म्हणत विद्यार्थी, विद्यार्थिनींना आणि तरुण चित्र शिल्पकारांना प्रोत्साहन देत वावरणारे साळवे सर!"
अहमदनगर येथे जन्मलेल्या व व तेथे प्राथमिक आणि त्यानंतर मुंबई येथे शालेय शिक्षण झालेल्या काशिनाथ साळवे यांनी 1963 मध्ये सर जेजे स्कूल ऑफ आर्ट येथे कलाशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि 1968 मध्ये शिक्षण पूर्ण केले. त्याच वर्षी त्यांची जे जे मध्ये शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून ते विद्यार्थ्यांमध्ये मनःपूर्वक रमले .
काशिनाथ साळवे प्रिंटमेकिंग या माध्यमातले किमयागार होते. हे अत्यंत तांत्रिक आणि क्लिष्ट माध्यम त्यांनी अशा काही सहजतेने आणि लीलया हाताळले की भले भले गाजलेले प्रिंट मेकर थक्क झाले. चित्र निर्मितीच्या क्षेत्रातही कोलाज, मिक्स मीडिया, फिगरेटिव्ह किंवा अमूर्त शैलीतही साळवे सर लीलया संचार करीत.
ऍक्रेलिक माध्यमात त्यांनी स्टील लाईफ हा विषय प्रयोगशील पद्धतीने हाताळला. शिवाय म्युरल किंवा भीतीचित्र या विषयातही साळवे सरांचे प्रभुत्व होते . लाकूड, धातू , सिरॅमिक अशी विविध माध्यमे वापरत साळवे सरांनी भव्य भित्तीचित्रे साकारली. साळवे सरांच्या अशा भित्तीचित्रांनी रिझर्व बँक ऑफ इंडिया-मुंबई, नाबार्ड -मुंबई, इंदिरा गांधी डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट, वसई रेल्वे स्टेशन, रिलायन्स रिफायनरी- जामनगर अनेक संस्थांच्या भिंती सजल्या आहेत.
पण साळवे सर खऱ्या अर्थाने रमले ते प्रिंट मेकिंग या माध्यमात ! 2001 मध्ये जे जे स्कूल आर्ट मधून पेंटिंग विभाग प्रमुख पदावरून ते निवृत्त झाले. पण शांत बसशील तर ते साळवे सर कसले ? त्यानंतर त्यांनी ग्रँड रोडच्या रॉबर्टमनी हायस्कूलमध्ये K ACADEMY OF FINE ART या नावाने एक स्टुडिओ सुरू केला नवोदित कलावंतांना काम करण्यासाठी अत्यल्प भाड्यात जागा उपलब्ध करून दिली. काही काळानंतर हा स्टुडिओ ठाणे येथील कोठारे कंपाउंड मध्ये स्थलांतरित झाला. त्यानंतर त्याचे नाव VISUAL ART ACADEMY असे करण्यात आले. त्यांच्या या स्टुडिओचा लाभ नवोदित तरुण कलावंतांनीच नव्हे तर अकबर पदमसी सारख्या ख्यातनाम कलावंतांनीही घेतला.
अनेक प्रतिष्ठित पारितोषिकांनी गौरविले गेलेले आणि देश परदेशात विविध आर्ट वर्कशॉप अनुभवलेले साळवे सर काल रात्री आपल्याला सोडून गेले.
साळवे सरांना मनःपूर्वक श्रद्धांजली!
सुहास बहुळकर.
( संदर्भ- Arvind Hate ,Salve, Kashinath Satyawan, Visual Art of Maharashtra)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.