औसा तालुक्यातील आशिवमध्ये हार्वेस्टर मशीनमध्ये पडून शेतकऱ्याचा मृत्यू
पत्नी व २ लहान मुलांवर उपजीविकेचे संकट
नागरिकांकडून आर्थिक मदत व कडक सुरक्षा नियमांची मागणी
पोलीस तपास सुरु
संदीप भोसले, लातूर
लातूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऊसतोडीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून लातूरच्या औसा तालुक्यातील आशिव येथील शेतकरी शंकर प्रभाकर सावंत (Shankar Sawant) या ४० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेतकरी शंकर प्रभाकर सावंत यांनी एक एकर जमिनीत ऊस पिक घेतलं होत. त्यांनी शेतात आलेल्या ऊस पिकाची तोडणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीन आणली होती. यावेळेस बाजूला पडलेला ऊस मशीनमध्ये टाकण्यासाठी शेतकरी जवळ गेल्याने अचानक त्यांचा तोल गेला आणि मशीन मध्ये शेतकऱ्याचे तुकडे तुकडे झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी तत्काळ मशीन बंद करून त्याला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शिअवय हार्वेस्टर मशीनच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा झाला का, याचा तपास केला जात आहे. मृत शेतकरी हा कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याने कुटुंबावर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मृत शेतकरी शंकर यांना दोन लहान मुलं आणि पत्नी असे कुटुंब आहे. या घटनेत घरातील करत्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे कुटुंबाचा आधारवड हरवल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सावंत यांच्या जाण्याने कुटुंबासोबतच गावात देखील शोककळा पसरली असून नागरिकांकडून प्रशासनाने मृताच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, तसेच हार्वेस्टरसारख्या यंत्रांबाबत कडक सुरक्षा नियम लागू करावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शेतात यांत्रिक साधनांचा वापर वाढत असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना अत्यावश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.