
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच परभणीत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला असून, यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, "सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधिलकी जपत काम करणारे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात भाजपा अधिक मजबूत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पक्षात आलेल्या सर्वांचा सन्मान राखला जाईल", असं ते म्हणाले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "परभणीच्या राजकारणात चार दशके आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या वरपुडकर यांच्या प्रवेशामुळे भाजपा संघटनेला निश्चितच बळ मिळेल." तर, पक्षप्रवेशानंतर सुरेश वरपुडकर म्हणाले की, "सर्वांच्या साथीने भाजपाची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीस हातभार लावण्याता प्रयत्न करू."
वरपुडकर यांच्यासोबत इतर महत्वाच्या नेत्यांनीही पक्षप्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, जिल्हा परिषद माजी सभापती परभणी धोंडीराम चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम वाघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रेरणा वरपुडकर, माजी समाजकल्याण सभापती द्वारकाबाई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य तुळशीराम सामाले, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर कटिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर लाड, दिलीपराव साबळे आदींचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आ. तानाजी मुटकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे, अमर राजुरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, परभणी महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.