सचिन बनसोडे
कोपरगाव (अहमदनगर) : कोपरगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे काळे आणि भाजपचे कोल्हे या दोन कारखानदारांचा राजकीय संघर्ष राज्याला सर्वसृत आहे. अजित पवार सत्तेत सहभाही झाल्याने (Kopargaon News) प्रतिस्पर्धी असलेले आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे आता महायुती (NCP) सरकारचे घटक आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या (BJP) नियोजनासाठी दोघेही एकाच मंचावर आले आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे बघायला मिळाले. (Maharashtra News)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून साखर कारखानदार असलेल्या काळे आणि कोल्हे या परंपरागत विरोधकांचा आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका काळे आणि कोल्हे हे एकमेकांविरोधातच उभे ठाकले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत काळे यांनी अवघ्या साडे आठशे मतांनी कोल्हे यांचा पराभव केला होता. आगामी निवडणुक जिंकण्यासाठी दोन्ही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. मात्र आता राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील अनेक मतदारसंघातील राजकीय समीकरणे सुद्धा बदलली आहेत.
दोघे एकाच मंचावर
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी सुद्धा अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार याची चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरू असतानाच शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आली. या बैठकीत काळे आणि कोल्हे हे राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यावर प्रथमच एका मंचावर आले. नियोजनाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अशितोष काळे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे शेजारी बसलेल्या असताना मला अजित दादांनी तिकीट देण्याचा शब्द दिला असल्याचा पुनरुच्चार केला आणि सभागृहात एकच हशा पिकला.
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री, भाजपचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री अशी परिस्थिती आहे. म्हणून या महायुतीत तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन चालाव लागणार आहे. नवीन असल्यामुळे थोडासा गोंधळ होणार आहे. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा त्यामुळे दादांनी सुद्धा सांगितले तिकीट राष्ट्रवादीला राहील. मात्र कोल्हेताई बीजेपीच्या असल्याने काय करायचं हा प्रश्न राहणारच आहे. आम्हाला काहीतरी ठरवावे लागेल असं वक्तव्य आमदार आशुतोष काळे यांनी केलं.
दरम्यान आशुतोष काळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुद्धा मला तिकीट मिळणार असल्याचा दावा केला आहे. अजून पुलाखालून बरच पाणी वाहून जायचं आहे. त्यांचे नेते त्यांना सांगतात तसेच आमचे नेते सुद्धा एबी फॉर्म देऊ का? असे आम्हाला विचारतात. काय निर्णय घ्यायचा तो वरिष्ठ नेते घेतील. मात्र आज नियोजनाची बैठक असताना आमदार काळे उत्साहाच्या भरात बोलून गेले असा टोला स्नेहलता कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांना लगावलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.