Kolhapur : घराला कुलूप लावून आईकडे गेली, चोराने 43 तोळं सोन्यावर डल्ला मारला; कोल्हापुरात जबराट चोरी
कोल्हापूरच्या तारदाळ येथील घरफोडी प्रकरणात दोन आरोपींना अटक
आरोपींकडून ५३ लाखांहून अधिक किमतीचे ४३ तोळे ७०० मिली सोनं, मोटरसायकल आणि मोबाईल जप्त
आरोपींनी कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगले भागातील अनेक घरफोड्यांची कबुली
पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडले
रणजित माजगावकर, कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये घरात कोणीही नसल्याची संधी साधून तरुणांनी डल्ला मारला. याप्रकरणी इचलकरंजी परिसरातील शहापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांकडून तब्बल ५३ लाख ७३ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक घरफोडींमध्ये सहभागी असलेल्या या चोरट्यांकडून ४३ तोळे ७०० मिली वजनाचे दागिने हस्तगत झाले आहेत.
कोल्हापूरमधील तारदाळ परिसरातील एका घरफोडी प्रकरणानंतर शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फिर्यादी महिला घराला कुलूप लावून आईकडे गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून ५ लाख ७६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार आणि उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम चोरी केलेलं सोनं विक्रीसाठी यड्राव भागात येणार आहेत. त्यानुसार सापळा रचून प्रल्हाद विठ्ठल कवठेकर आणि उदय श्रीकांत माने या दोघांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत सोन्याचे दागिने मिळताच आरोपींनी तारदाळमधील घरफोडीसह शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण हददीतील घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलिसांनी दोघांकडून एकूण ४३ तोळे ७०० मिली सोनं, चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला. मुद्देमालाची एकूण किंमत ५३ लाख ७४ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
