Kolhapur News: कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शेती भूमापन करत असताना कर्मचाऱ्याचा विहिरीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हातकणंगले तालुक्यातील रुई गावामध्ये ही घटना घडली. राजेंद्र रामचंद्र कोळी असं या भूमापन कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेचा तपास कोल्हापूर पोलिसांकडून (Kolhapur Police) सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील रुई गावालगत असलेल्या शेत जमिनीच्या मोजणीचे काम सुरु होते. शेत जमीन मोजण्यासाठी कुंभोजमधील भूमापन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी आले होते. यावेळी भूमापन करत पायवाटेने जात असताना राजेंद्र कोळी (45 वर्षे) या कर्मचाऱ्याचा तोल जाऊन ते विहिरीमध्ये पडले. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
राजेंद्र कोळी ज्या विहिरीमध्ये पडले ती 50 फूट खोल असून त्यामध्ये पाणीही खूप आहे. काही नागरिकांनी विहिरीत उतरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचा शोध घेताना अडचण येत होती. त्यांनी राजेंद्र यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राजेंद्र यांचा मृतदेह हाती लागला.
घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून राजेंद्र कोळी यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा तपास हातकणंगले पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच राजेंद्र कोळी यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.