काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगरावर दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संपूर्ण कुटुंब यात उद्ध्वस्त झालं. अवघ्या १९ वर्षांचा कुणाल चांदुगडे यानं या डोंगरावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. मुलगा डोंगरमाथ्यावर अगदी टोकावर उभा होता. त्याला वाचवताना वडिलांनी हात पकडला. पण मुलानं वडिलांनाही खेचलं आणि दोघेही खाली पडले. काही कळण्याच्या आत आईनंही डोंगरावरून उडी मारली. यात तिघांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला आयफोनसाठी मुलानं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात होते. पण त्यात तथ्य नसल्याचं समोर आलं. यामागे वेगळीच कारणे असल्याचे आता दावे केले जात आहेत.
कुणाल आणि आई-वडिलांच्याही मृत्यूच्या घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. २० वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळं कुणालनं हे पाऊल उचलल्याचं आता सांगितलं जात आहे. कुणालच्या मावशीनं याबाबत माहिती दिली आहे. कुणालचे वडील मुरलीधर हे ट्रक ड्रायव्हर असले तरी, त्यांना शेतीतून बरेच पैसे मिळत होते. कुणालला डॉक्टर व्हायचे होते. तो परीक्षा देणार होता. त्याच्याकडे आधीपासूनच २ आयफोन होते. कुणालच्या आईकडेही आयफोन होता. त्यामुळे कुणालने आयफोनसाठी आत्महत्या करणे शक्य नाही, असे तिचे म्हणणे आहे.
कुणालच्या मावशीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात २० वर्षांपासून जमिनीसंबंधित अनेक वाद होते. कु्णालच्या आईला घरच्यांकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. या सगळ्या त्रासाला कंटाळून मुरलीधर हे कुणाल आणि त्याच्या आईपासून दूर राहायचे. वडील एकत्र राहत नसल्याने कुणाल कायम निराश असायचा. त्यांच्यामध्ये वाद वाढत चालले होते. अनेक गैरसमज होत होते. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणालची आई आपल्या भावना व्यक्त करायची.
कुणालला आपल्या वडिलांचे प्रेम मिळत नव्हते. कौटुंबिक वादामुळे बापलेकांची ताटातूट होत होती. यामुळे कुणाल डिप्रेशनमध्ये होता. याआधी देखील २०२५ मध्ये कुणाल खवड्या डोंगरावर फक्त फिरण्यासाठी गेला होता. कदाचित कुणालला आत्महत्या करायची नव्हती, स्वत:ला अडचणीत टाकून फक्त आईवडिलांना एकत्र आणायचे तो प्रयत्न करत होता. त्याच प्रत्यनात असताना कुणालचा पाय घसरला असावा, असे कुणालच्या मावशीचं म्हणणं आहे.