Kartiki Ekadashi: शेतकऱ्यावरील दुष्काळाचे संकट दूर कर, राज्यात चांगला पाऊस पडू दे; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विठूरायाला साकडे

Kartiki Ekadash Mahapuja By Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा करण्यात आली.
Kartiki Ekadashi: शेतकऱ्यावरील दुष्काळाचे संकट दूर कर, राज्यात चांगला पाऊस पडू दे; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विठूरायाला साकडे
Kartiki EkadashSaam Tv
Published On: 

भरत नागणे, पंढरपूर

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता सपत्नीक संपन्न झाली. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मानाचा वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील उंचेगाव येथील सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी‌ प्रणिता सुधाकर शिंदे यांना मिळाला.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्र्यांनी विठूरायाला साकडे घातल्याचे सांगितले. 'यावर्षी राज्यातील शेतकऱ्यावर दुष्काळाचे मोठे संकट आले आहे. या संकटातून शेतकऱ्याला सावरण्याची ताकद मिळू दे, पुढील काळात चांगला पाऊस पडून आलेले संकट दूर व्हावे, राज्यातील शेतकरी सुखी-समाधानी व्हावा.', असे साकडे आपण आज विठू चरणी घातल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्याचा पहिला हक्क आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्याला कोणतीही मदत कमी पडू देणार नसल्याचे आश्वासनही यावेळी शिंदे यांनी दिले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या आणि चारा डेपो सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वकाही पांडुरंगाच्या कृपेने मनासारखं होईल.

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी पस्तीसहून अधिक प्रकारच्या देशी व विदेशी फुलांचा तसेच विविध प्रकारच्या शोभिवंत पानांचा वापर करण्यात आला असून, सुमारे ५ टन फुलांमधून मंदिर परिसराला आकर्षक आणि मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे. ही सजावट पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी केली आहे.

या पुष्पसजावटीमध्ये झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, लक्ष्मी कमळ, मोगरा, जाई, जुई, चाफा, तगर, कागडा, लिली, कन्हेर, निशिगंधा, लिलीयम, ऑर्किड, अँथुरियम, कार्नेशन, सूर्यफूल, ब्लू डेझी, जरबेरा, ग्लॅडिओलस, पिंक डेझी, गुलटप्पा, जास्वंद आदी विविध रंगांच्या फुलांचा समावेश आहे. तसेच तुळस, कामिनी, अशोकाची पाने, विड्याची पाने, केळीचे खांब, जिप्सो, मनीप्लांट, ड्रॅसिना, टेबल पाम, सॉन्ग ऑफ इंडिया आदी शोभिवंत वनस्पती व पानांचाही सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.

मंदिरातील संत नामदेव पायरी, महाद्वार, विठ्ठल सभामंडप, सोळखांबी, चौखांबी, श्री रुक्मिणीमाता सभामंडप, व्हीआयपी गेट तसेच पश्चिम द्वार या प्रमुख ठिकाणी ही पुष्पसजावट साकारण्यात आली आहे. विविध रंगांच्या फुलांची आकर्षक मांडणी, पारंपरिक व कलात्मक सजावटीचा संगम यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही पुष्पसजावट विशेष आकर्षण ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.