मराठा आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतवाली सराटी गावात जंगी सभा घेतली. 100 एकरवर झालेल्या या सभेला लाखो मराठा बांधवांनी हजेरी लावली. यावेळी मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं. येत्या 10 दिवसांत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, नाहीतर मोठं आंदोलन करणार असा इशाराच जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. (Latest Marathi News)
इतकंच नाही, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करणाऱ्यांना देखील जरांगे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
100 एकरात होणाऱ्या सभेसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च येतो, एवढे पैसे कुठून आले? असा सवाल छगन भुजबळांनी विचारला. छगन भुजबळ यांच्या या प्रश्नाला मनोज जरांगे यांनी सडेतोड उत्तर दिलं. माझा मराठा बांधव काबाडकष्ट करून शेतात घाम गाळतो. त्यातून आम्ही हा निधी जमा केला आहे.
123 गावांपैकी 22 गावातील लोकांनी या सभेसाठी पैसे दिले आहेत. 100 एकराची जागा शेतकऱ्यांनी सभेसाठी दिली आहे. आम्ही ती विकत घेतली नाही, असं खणखणीत उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिलं आहे.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलायला नाही पाहिजे आणि आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या लेकरांविरुद्ध तर बोलायलाच नाही पाहिजे. कोटी ही गोष्टच आम्हाला माहीत नाही आणि तुम्ही 50 कोटींबद्दल बोलत आहात. पण कोटी ही तुम्हाला माहीत आहेत, म्हणून तुम्ही तुरुंगातून बेसन खाऊन आलात, असा टोलाही जरांगे यांनी भुजबळांना लगावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.