जळगाव : कोरोनाच्या महामारीमुळे मास्कचे महत्त्व नागरिकांना कळले असले तरी वापरलेले दूषित मास्क निर्जंतुक न करता उघड्यावर फेकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या मास्कमुळे पक्ष्यांना धोका निर्माण होत आहे. शिवाय, पक्षी ते चोचीत पकडून अन्यत्र नेत असल्याने संसर्गाचा धोकाही बळवतोय. (jalgaon-news-coronavirus-use-mask-Risk-of-infection-due-to-exposed-contaminated-mask)
मास्क उघड्यावर, रस्त्यात फेकू नका. आपल्या श्वासाने ते दूषित झालेल्या व पर्यावरण विघातक असलेल्या या मास्कला भक्ष्य वा अन्नपदार्थ समजून पक्षी त्यांना उचलत आहेत. त्यामुळे हा दूषित व पर्यावरण विघातक पॉलीप्रोपेलिन मास्क पक्ष्यांच्या आरोग्यालाही घातक ठरत आहेत. शिवाय, पक्षी हे मास्क चोचीत पकडून इतरत्र विहार करतात, त्यामुळे दूषित मास्क अनेक ठिकाणी पडते, त्यातून संसर्ग होण्याची शक्यताही बळावते.
पर्यावरणासाठीही घातक
मास्क पॉलीप्रोपेलिन या पदार्थापासून बनलेले असतात. या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे उघड्यावर फेकल्यानंतर तो पॉलिथिन सारखाच लवकर नष्ट न होता वर्षानुवर्षे टिकतो. त्यामुळे मास्कची योग्य विल्हेवाट न लावल्यास आपण पर्यावरणीय प्रश्नही निर्माण करणार आहोत. यासाठी वापरण्यात येणारे इलॅस्टिकसुद्धा प्लॅस्टिकचाच प्रकार आहे. त्याचेही विघटन होणे कठीण आहे. हा लवकर नष्ट न होता वर्षानुवर्षे टिकतो. त्यामुळे पर्यावरण विघातक आहे, अशी माहिती पक्षिमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
अशी लावावी मास्कची विल्हेवाट
वापरलेल्या मास्कला पाण्यात ५ % ब्लिचिंग पावडर मिसळून तयार केलेल्या द्रवात ५ ते १० मिनिट निर्जंतुक करा मग कागदात गुंडाळून कचरापेटीत मध्ये टाका. किंवा १% सोडियम हायपोक्लोराइट आणि पाण्याचे द्रव वापरून त्यात मास्क निर्जंतुक करून मग कागदात गुंडाळून कचरापेटीत मध्ये टाका. जर घराजवळ तुमच्या मालकीची मोकळी जागा असेल तर त्यात खोल खड्डा करून त्यात मास्क जमिनीत गाडून द्यावे. सर्वांत सुरक्षित पद्धत म्हणजे वापरलेले मास्क सुरक्षितरीत्या जाळावे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.