

हिंगोलीचे ‘बापू’ म्हणून ओळख
भाजपच्या पायाभरणीत महत्त्वाची भूमिका
जनसंपर्क आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध
हिंगोलीचे ‘बापू’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जनसंपर्क आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी राजकारणात आपली ओळख निर्माण केली होती.
बळीराम पाटील कोटकर हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून १९९० मध्ये निवडून आले होते. हिंगोली जिल्ह्यात भाजपची पायाभरणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील रहिवासी असलेले बळीराम पाटील कोटकर हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. स्पष्टवक्तेपणा आणि करारी नेतृत्वामुळे ते राजकीय क्षेत्रात परिचित होते. बापू नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोटकरांचा जनसंपर्कही दांडगा होता.
१९९० मध्ये भाजपकडून हिंगोली विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसच्या साहेबराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर ९५ मध्ये सलग दुसऱ्यांदा त्यांना हिंगोलीच्या मतदारांनी पसंती दिली होती. २००० च्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती, त्यावेळी बळीराम पाटील यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांचे मन फार काळ या पक्षात रमले नाही आणि ते पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतले. हिंगोली जिल्हा निर्मितीमध्येही ते अग्रेसर होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या बळीराम पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात गावचे पोलीस पाटील आणि सरपंच म्हणून केली होती. १९९० आणि १९९५ अशा सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती. हिंगोली जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी आणि सेनगाव तालुका अस्तित्वात येण्यासाठी बळीराम पाटील कोटकर यांनी तत्कालीन काळात प्रयत्न केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.