

देशभरातल्या लाखो वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) संदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. त्यानुसार ६ वर्षांपर्यंत जुन्या BS6 खासगी वाहनांसाठी PUC प्रमाणपत्राची वैधता १ वर्षाऐवजी ३ वर्षे करण्याचा प्रस्ताव आहे.
जर हा नियम लागू झाला तर वाहनचालकांना दरवर्षी PUC तपासणी करून प्रमाणपत्र काढण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होईल. तसेच प्रस्तावानुसार ६ वर्षांपर्यंतच्या BS6 वाहनांची प्रदूषण तपासणी दर ३ वर्षांनी एकदाच करावी लागेल.
६ ते १० वर्षे जुन्या BS6 वाहनांसाठी दर ६ महिन्यांनी प्रदूषण चाचणी करणं अनिवार्य असेल. तसेच जुन्या वाहनांसाठी नियम जास्त कडक करण्याचा प्रस्ताव आहे.BS4 वाहनांचं PUC प्रमाणपत्र दर ६ महिन्यांनी , तर BS1, BS2 आणि BS3 वाहनांची प्रदूषण तपासणी दर ३ महिन्यांनी करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
BS म्हणजे भारत स्टेज (Bharat Stage) उत्सर्जन मानके. वाहनांमधून होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ही मानके लागू करण्यात आली आहेत. भारतात एप्रिल २०२० पासून BS6 मानके लागू करण्यात आली असून, BS4 नंतर थेट BS6 प्रणाली स्वीकारण्यात आली. BS6 इंजिनमध्ये कमी सल्फरयुक्त इंधन वापरलं जात असल्याने ही वाहने तुलनेने कमी प्रदूषण करतात.
महत्त्वाचं म्हणजे, हे नियम अजून लागू झालेले नाहीत. सरकारने सध्या फक्त मसुदा अधिसूचना जारी केली असून नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर देशातल्या लाखो BS6 वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.